पुणे : मुलांनी पुन्हा पुस्तकांच्या विश्वात रमावे, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने स्त्री मुक्ती संघटने कडून बिबवेवाडी ओटा येथील समुपदेशन केंद्राच्या अंतर्गत मुला-मुलींसाठी पुस्तक वाचन स्पर्धा घेण्यात आली. इ. ५ वी ते ७ वी (लहान वयोगट) आणि इ. ८ वी ते १० वी (मोठा वयोगट) या दोन वयोगटासाठी १३ मे रोजी स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण ३३ स्पर्धक सहभागी झाले.
बिबवेवाडी ओटा या सेंटर च्या परिसरात अनेक शालेय विद्यार्थी राहतात. शाळांना सुट्टी असल्याने दिवसभर काय करायचे याबाबत मुलांना काही सुचत नव्हते. तसेच गेल्या दोन वर्षातील ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचा पुस्तकांशी संबंध कमी आणि मोबाईलवर वेळ जास्त जात आहे. मोबाईलच्या व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्व मुलांना एकत्र आणून काही उपक्रम घ्यावा ह्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘अक्षरवेल’ या संस्थेकडून मिळालेल्या पुस्तक पेटीमधील विविध गोष्टींची पुस्तके मुलांसाठी उपलब्ध होती. स्नेहल नेने यांनी मुलांना पुस्तक वाचन कसे करावे यासाठी एक गोष्ट वाचून दाखविली. स्पर्धेच्या मध्यंतरामध्ये संदीप निकम, अमित घाडगे, श्रावस्ती गाडे, श्रद्धा कदम, विकास गवळी, शितल अंकुश, निर्मला खैरे, स्वप्नाली लावंड या समुपदेशकांनी भावनांची ओळख आणि तळ्यात-मळ्यात हे खेळ घेतले.
या वाचन स्पर्धेला मुलांचा व मुलींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. मुलांना देखील ही स्पर्धा खूप आवडली. तसेच मुलांनी येथून पुढे अशी गोष्टींची पुस्तके वाचनास मिळावीत अशी इच्छा व्यक्त केली. शेवटी अक्षरवेल या संस्थेकडून उपस्थित अंजली मुळे आणि स्नेहल नेने यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले व सहभागी स्पर्धकांना हि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.











