पुणे : सद्गगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक पालकत्व मोहिमेअंतर्गत दुर्गम भागांतील वडिलांचा आधार नसलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन त्यांना शैक्षणिक मदतीबरोबरच आरोग्य व इतर कौटुंबिक अडचणीमध्येही मदत करण्यात येत आहे.
संस्थेच्या वतीने दरवर्षी दानशूर मित्रांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाते. आज या मोहिमेत २ विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणारे समाजमित्र अमित सोनपेठकर आणि सागर पडवळ यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या योजनेच्या निमित्ताने समाज आणि नातेवाईक यांच्या सहवासात राहून ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावीत व भविष्यात स्वतःच्या पायावर उभी राहावीत हा संस्थेचा प्रयत्न आहे.











