सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा. प. रा. आर्डे यांचे १४ आक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांचे इच्छेनुसार मृत्यू पश्चात कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचे भारती हॉस्पिटल ला देहदान केले गेले.
प्रा. आर्डे यांनी फिजिक्सचे विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून ३२ वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सातारा येथे अंनिसच्या कार्याला सुरुवात केली. सेवानिवृत्त नंतर त्यांनी पूर्णवेळ अंनिस च्या कामाला वाहून घेतले होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे १९ वर्षे संपादक म्हणून काम केले. त्यांनी दाभोलकर सोबत लिहलेल्या ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह, पूर्णविराम’ या राजहंस प्रकाशने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या ३० हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांनी खगोलशास्त्र, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मा पुर्नजन्म, प्लॅन्चेट, मुलांसाठी सोप्या भाषेत हसत खेळत विज्ञान या विषयावर पुस्तके लिहली आहेत. छद्मविज्ञान या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे, अनेक संस्था चे पुरस्कार मिळाले होते.
प्रा. आर्डे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांना मराठा समाज सांगली, पी. डी. पाटील कराड गौरव पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पश्चात पत्नी उषाताई, मुलगा विनय, मुलगी रुपा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.