उस्मानाबाद : अन्नपुर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वैराग रोडवरील पिंपरी शिवारात भाकड गाय पालन प्रकल्पाचे
उद्घाटन आणि वृक्षरोपण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी या प्रकल्पाचे कौतुक करून भविष्यात या प्रकल्पासाठी भरीव योगदान देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी या कार्यक्रमात प्रकल्पास देणगी देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर नागरिक, विविध राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, आणि अन्नपूर्णा ग्रुपचे सर्व स्व्यंसेवक, तसेच पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्नपुर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्था गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात मोफत अन्नछत्र चालवीत आहे. या सहा वर्षात जवळपास बारा लाख गरजू लोकांना त्यांनी अन्न पुरविले आहे. या सोबतच ते इतर ही विविध सामाजिक उपक्रम चालवत आहेत.