मुंबई, कांदिवली : आभा परिवर्तनवादी संस्थेच्या वतीने विघ्नहर्ता मित्र मंडळ चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे जागर संविधानाचा उपक्रम राबविण्यात आला. जागर संविधानाचा या उपक्रमाचे कार्यवाह रोचना विद्या आणि प्रतिक मोहिते यांनी उपस्थित लोकांशी संविधानाचा संवाद साधत प्रबोधन केले.
सार्वजनिक गणेशोत्सवात पहिल्यांदाच संविधानाचा जागर करण्यात आला. आभा संस्थेचा हा ८ वा संविधान संवाद कार्यक्रम होता. मागील ९ वर्षांपासून संस्था हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १३,००० लोकांपर्यंत संविधानाची मूल्य पोहचविण्यात संस्थेला यश आले आहे असे संस्थेचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी सांगितले.
गणपतीला बुद्धीची देवता असे संबोधले जाते. गणेशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळ काहीना काही कार्यक्रम घेत असतात पण श्री विघ्नहर्ता मंडळ सारखी काही मंडळ खरंच देश घडविण्यामध्ये आपलं योगदान देत असतात. संविधान प्रचार आणि प्रसाराच काम हे देश घडविण्याचे काम आहे.
जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या परिसरात, सोसायटी, मंडळ, शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये असे देश घडविण्याचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन उपक्रम कार्यवाह प्रतीक मोहिते आणि रोचना विद्या यांनी यानिमित्ताने केले.