पुणे : ‘केअरिंग हॅण्ड्स’ संस्थेच्या वतीने नियोजित ‘स्वानंद’ या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या निवारा आणि विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन समारंभ आंबी, (मावळ) येथे पार पडला. एकल ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण होत असलेल्या या विरंगुळा केंद्रात अनेक ज्येष्ठांना आधार मिळणार असून, संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. संस्थेचे कार्य सामाजिक सक्षमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. असे प्रतिपादन यावेळी ला. मेहेर अंकलेसरिया यांनी केले.
‘केअरिंग हॅण्ड्स’ ही सामाजिक संस्था गेली सात वर्षे समाजातील भटक्या-विमुक्त जाती-जमातींतील निराधार, निराश्रित बालकांच्या सर्वांगीण संस्कारक्षम पुनर्वसन संगोपनाचे कार्य करीत असून, संस्थेच्या ‘कलाश्रम’ या उपक्रमांतर्गत सध्या ५३ निराधार संकटग्रस्त बालकांना आधार देण्यात आला आहे. याच उपक्रमाच्या बरोबरीने सध्या महानगरांमधून एकल ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड पूर्णपणे थांबविण्यासाठी, संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून ‘स्वानंद’ विरंगुळा केंद्र हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमामुळे ज्येष्ठांना चांगल्या प्रकारे आधार मिळत आहे आणि त्यांचे उर्वरित जीवन कौटुंबिक वातावरणात जात आहे, असे ‘केअरिंग हॅण्ड्स’चे सचिव अंबादास चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.
संस्थेच्या ‘स्वानंद’ या उपक्रमात लायन्स क्लब ऑफ पूना, सारसबाग आणि रांका ज्वेलर्स यांच्या सहयोगाने भव्य तीन मजली वास्तू निर्माण होणार असून, येत्या वर्षभरात ‘स्वानंद’ पूर्णपणे ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी तयार होत आहे. याच वास्तूचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला. याच कार्यक्रमात आसपासच्या वाड्या-वस्त्यांवरील गरजू, होतकरू महिलांसाठी ‘टाटा मोटर्स’च्या महिला गृह उद्योग समूहाच्या वतीने शिवणकला या उपक्रमाचे उद्घाटन, ‘एमआयडीसी’चे मुख्य अभियंता संजय कोतवड आणि अभियंता संतोष सुवर्णकार यांच्या प्रमुख उपस्थितीत, आंबी गावच्या सरपंच संगीता घोजगे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कोतवड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ला. दीपाली गांधी यांच्या हस्ते संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना साडीवाटप केले. संस्थेच्या या कार्यक्रमास रुक्साना मेहेर अंकलेसरिया, कु. खोर्दे मेहेर अंकलेसरिया, ला. फतेचंद रांका, लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल सुगंधी, लाय दीपाली गांधी, ला. पूनम अष्टेकर, ला. दर्शन तोतला, त्याचप्रमाणे केअरिंग हॅण्ड्सचे आधारस्तंभ सुधीर नाईक, अरविंद तेलकर, प्रशांत ताम्हणकर, दिगंबर उचगावकर, नीलेश जाधव, जितेंद्र उत्तमचंदानी, संस्थेचे अभियंता राज गोसावी आणि शैलेंद्र मसलेकर उपस्थित होते. अंबादास चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.