बुलढाणा – सिंदखेड राजा : मियावाकी वृक्ष लागवड अंतर्गत सिंदखेड राजा मोताळा तालुक्यात जपानी पद्धतीने १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तब्बल दोन एकर जमिनीवर पाच तासात वृक्षलागवड पूर्ण करण्याचा विक्रम या गावाने रचला. या वृक्षलागवडीचे रूपांतर एका वर्षात घनदाट जंगलात होणार आहे.
पाणी फाऊंडेशन व सेव-ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेड या गावाची मियावकी जंगलासाठी निवड करण्यात आली होती. यासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च आला आहे. बंगलोर येथील सेव-ट्रीज या संस्थेने पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने हा खर्च केला आहे.
सिंदखेड प्रजा येथील सरपंच प्रवीण कदम यांची संकल्पना आणि विशेष प्रयत्नांमुळे सिंदखेडला संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पाहिले जाते. कदम यांनी सिंदखेड येथे आजवर अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे फलित म्हणजे या गावाला लाभलेले एक अनोखे निसर्गरम्य असे वातावरण. वॉटर कप स्पर्धेत या गावाने राज्यातून दुसरा येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
पाणी फाउंडेशन, ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या सहकार्याने जलसंधारणाचे काम या गावात झाले आहे. बालसंस्कार शिबिर, तरुण-तरुणींसाठी कबड्डी स्पर्धा, व्यसनमुक्तीवरील कार्यक्रम व तरुणांना उद्योगाच्या दिशेने वळविण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम सरपंच कदम यांच्या संकल्पनेतून राबविले जात आहेत.