पुणे : थायलेसिमिया असणाऱ्या प्रत्येक लहान मुलांना रक्त भरण्यासाठी करावी लागणारी वणवण आता थांबणार आहे. ‘Helping Hands For Blood आणि ‘सुविधा मल्टीस्पेशेलिटी अँड आय.सी.यु हॉस्पिटल’च्या माध्यमातून महाराष्ट्रातले पहिले मोफत खाजगी “Blood Transfusion Center” सुरू करण्यात आले आहे.
पैशांअभावी रक्त भरण्यासाठी, हवे ते रक्त मिळवताना होणारी तळमळ-धावपळ, अगतिकता, या साऱ्या त्रासापासून थायलेसिमिया असणाऱ्या लहान मुलांच्या पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. रक्तासाठी सरकारी रुग्णालयात होणारी परवड तसेच खासगी रुग्णालयाच्या बिलापासून काही अंशी सुटका होणार आहे.
राहुल सिद्धार्थ साळवे, डॉ. केतनकुमार गायकवाड आणि डॉ. स्वप्नील पाटील यांच्या संकल्पनेतून थायलेसिमीया असणाऱ्या लहान रुग्णांसाठी सुविधा मल्टीस्पेशेलिटी अँड आय.सी.यु. हॉस्पिटल’ संभाजीनगर, चिंचवड पुणे येथे मोफत Blood Transfusion ची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटरचे उद्घाटन सुविधा मल्टीस्पेशेलिटी अँड आय.सी.यु. हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील आणि डॉ. केतनकुमार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. धीरज सोनी ( CEO सुविधा हॉस्पिटल ), डॉ. योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते आर्यन आखाडे, के. अभिजीत, मिलिंद दामोदरे आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
येत्या काही वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी असे मोफत ‘Blood Transfusion Center’ ‘हेलपिंग हॅन्ड फॉर ब्लड च्या माध्यमातून सुरु करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
थायलेसिमिया असणाऱ्या लेकरांसाठी आपण काय करू शकतो? हा विचार कित्येक दिवस डोक्यात फिरत होता. सरकारी यंत्रणेवर असणारा बोझा आपण कितीही म्हंटले तरी कमी करू शकणार नाही. पण खाजगी यंत्रणेत आपण काहीतरी करू शकतो हे लक्षात आले. काही डॉक्टर मित्रांच्या मदतीने ही कल्पना सुचली.
राहुल सिद्धार्थ साळवे, Helping Hands For Blood