परभणी: महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे एका निराधार विधवेला शिलाई मशीन देण्यात आली. तसेच एकल पालक मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून विष्णू नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. शिवा आयथळ यांनी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
सेलू तालुक्यातील वालुर येथील एका निराधार दुर्धर आजारग्रस्त महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर ती महिला अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत होती. या महिलेने शिलाई मशीन चालविण्यासाठी प्रशिक्षण घेतले असून संस्थेतर्फे सर्व कागदपत्रे व घरची बिकट आर्थिक परिस्थिती आदींचा विचार करून या गरजू महिलेला शिलाई मशीन देण्यात आली. या मशीनवर ती महिला तिच्या भागात काम करून तिला कुटुंबाचा उदरनिर्वाहसाठी मदत होऊ शकते.
तसेच या कार्यक्रमात परभणीत भारतीय बाल विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या एका निराधार एकल पालक मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिला इयत्ता दहावीत लागणारी सर्व पुस्तके, शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्यात आला.
याप्रसंगी ६ ते१३ वयोगटातील मुला मुलींसाठी चित्रकला व ललित कला कार्यशाळाbआयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील कलाशिक्षक प्रा. पांडुरंग पाटणकर यांनी विविध प्रयोगातून मुलांना कलेतुन मनोरंजन, गाणी, कागदी टोपी, कला कुसर, वारली पेंटिंग, ग्रिटिंग आदि चे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेस २४ मुलांची उपस्थिती होती. या मुलांनी या कार्यशाळेत उत्स्फुर्तपणे प्रतिसाद नोंदवला. शेवटी लहान व मोठा गटातील प्रत्येकी दोन मुलांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमासाठी १०० रुपये प्रति माह डोनेशन या नावे तयार केलेल्या ग्रुपने मोलाचा सहयोग दिला. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. सौ. आशा चांडक, प्रा. शिवा आयथळ, विशाल मुंदडा, संदीप भंडे, बद्रीविशाल सोनी, सत्यंजय हर्षे, प्रा पांडुरंग पाटणकर, प्रा. पद्मा भालेराव, रवी मौर्य, राठोड, वैभव राका, अनुराधा अमिलकंठवार यांनी प्रयत्न केले.