बाल संरक्षणासाठी समाज आणि शासनाने एकत्र येवून काम करण्याची गरज
पुणे : महिला बाल विकास विभाग, युनिसेफ, मिरॅकल फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्दमानाने सुरु असलेल्या कार्यक्रमाची आढावा सभा/कार्यशाळा मोठ्या उत्साहाने पुण्यात संपन्न झाली.
एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकासाठी मिळवून देणाऱ्या या चळवळीत आज अनेक सहभागीदार सामील झाले होते. राज्यात कुटुंब आधारित आणि पर्यायी संगोपनाचा पुरस्कार करण्यासाठी व तो अधिक दर्जेदार व्हावा यासाठी महिला बाल विकास विभाग, युनिसेफ, मिरॅकल फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशन यांच्या सहकार्याने गेली ४ वर्षे कुटुंब आणि समाज सबलीकरणाचे काम रामनगर वस्ती, वारजे येथे प्रायोगिक तत्वावर सुरु आहे.
बालकांच्या संगोपनात आणि संरक्षणात कुटुंब आणि समाज यांची भूमिका आणि जबाबदारी खूप महत्वाची आहे. त्याच बरोबर बालकांशी संबंधित प्रश्नाचे, कायद्याचे महत्व कळावे, समाजातील सर्वांना त्याची गरज निर्माण व्हावी व उपलब्द असलेल्या योजना, सेवा सुविधा, याची माहिती सविस्तर मिळावी जेणे करून कुटुंब आणि समाज अधिक प्रगल्भ होईल या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमास पुणे शहरातील वेगवेगळ्या विभगातील अधिकारी / प्रतिनिधी, सामाजिक स्वयंसेवी संस्था, समुदायातील यंत्रणा यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर मिरॅकल फाउंडेशन संस्थेच्या राज्य प्रमुख स्वरांजली थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचे ध्येय आणि उद्देश सांगितला तर दीपक फाउंडेशन संस्थेचे कार्यक्रम समन्वयक रोहित गाडेकर यांनी झालेल्या कार्यक्रमाचा प्रगती आढावा आणि अडचणी याबद्दल सविस्तर सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येक उपस्थित विभगातील अधिकारी / प्रतिनिधी यांना त्यांच्या विभागाबद्दल व उपलब्द असलेल्या सेवा सुविधा, योजना याबद्दल माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. यामध्ये शिक्षण, पोलीस, एकात्मिक बाल विकास, पोष्ट ऑफिस, चाइल्ड लाईन, आर्क नेटवर्क, होप फॉर चिल्ड्रेन, युथ अम्बेसिडर यांनी आपल्या कामाविषयी आणि उपलब्द असलेल्या सेवा सुविधा, योजने बद्दल सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रामध्ये चर्चा सत्र आयोजित केले होते, चर्चा सत्रामध्ये बाल अधिकार आणि बाल संरक्षण, कुटुंब आणि समाज सक्षमीकरण, या विषयावर चर्चा झाली. यामध्ये रामनगर वस्ती मध्ये कार्यरत असलेली वस्ती बाल संरक्षण समिती, बाल पंचायत आणि समुदाय स्वयंसेवक यामधील निवडक सदस्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये दिलीप भाऊ बराटे (माजी उप- महापौर /विरोधी पक्ष नेते/ रामनगर वस्ती बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष) यांनी रामनगर वस्तीमध्ये झालेला बदल, बालक आणि पालक यांच्यामध्ये वाढलेला आत्मविश्वास आणि समाजामध्ये बाल अधिकार आणि बाल संरक्षण याबद्दल होत असलेल्या जागृती बद्दल समाधान व्यक्त केले, आणि येणाऱ्या काळामध्ये बाल संरक्षणाचे काम समुदाय यंत्रणा यांच्या सहकार्याने आणखी जोमाने चालू ठेवू असा विश्वास त्यांनी दिला.
या कार्यक्रमास तृप्ती पाटील, पोलीस उप निरीक्षक (बाल स्नेही पोलीस अधिकारी, वारजे माळवाडी पुणे), दिलीप भाऊ बराटे, नगरसेवक (माजी उप- महापौर /विरोधी पक्ष नेते/ रामनगर वस्ती बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष), स्वरांजली थोरात, राज्य प्रमुख, मिरॅकल फाउंडेशन इंडिया संस्था, अरुणा मॅडम, सुपरवाइजर, शिक्षण मंडळ, पुणे महानगर मालिका, जयश्री शिंदे, शिक्षिका, रामनगर महानगर पालिका शाळा, सुनील किर्वे, पोस्ट कार्यालय, वारजे,मंजुषा अहिरराव, सुपरवाइजर, एकात्मिक बाल विकास विभाग, रोहिणी शिंदे, चाइल्ड लाईन समन्वयक, सुशांत, (आर्क नेटवर्क प्रतिनिधी,) विशाल वाघमारे, सचिन, (होप फॉर चिल्ड्रेन प्रतिनिधी), अक्षता (युथ अम्बेसिडर,) वस्ती बाल संरक्षण समिती सदस्य, बाल पंचायत समिती सदस्य, समुदाय स्वयंमसेवक, पालक, लक्षित कुटुंब सदस्य, मिरॅकल फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशन संस्थेचे कर्मचारी वर्ग आणि वस्तीमधील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर शितोळे यांनी केले तर शेवटी आभार रोहित गारोळे यांनी व्यक्त केले.