पुणे : निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथी भटके विमुक्त महिला हक्क परिषद पुणे येथे १९ व २० एप्रिल रोजी संपन्न झाली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून परिषदेचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक निर्माण संस्थेच्या वैशाली भांडवलकर यांनी केले.
परिषेदेच्या दुसऱ्या सत्रात पद्मश्री लक्ष्मण माने यांनी उपस्थित राहून भटक्या विमुक्त इतिहास, संस्कृती आणि तत्वज्ञान यावर सविस्तर आणि विश्लेषणात्मक मांडणी आणि मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भटक्या विमुक्त समूहातील विविध जिल्ह्यातून आलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात डॉ. राजेंद्र कुंभार यांनी भटक्या विमुक्त जमातींचे बदलते स्वरूप यावर भाष्य केले त्याच बरोबर लता प्रतिभा मधुकर यांनी स्त्री चळवळ आणि भटके विमुक्त महिला या विषयावर मांडणी केली.
चौथ्या सत्रात डॉ. संजय कोळेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी भटक्या विमुक्त जमातींवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे स्वरूप, व्याप्ती यावर संशोधनपर मांडणी केली. ऍड. असीम सरोदे विधी तज्ञ यांनी कायद्याचे स्वरूप आणि कायदा बनविण्यासाठीची प्रकिया यावरती भाष्य केले. अध्यक्षीय समारोप किरण मोघे जनवादी महिला संघटना यांनी केला