पुणे : १४ नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो, तर संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल दिवस म्हणून घोषित केलेला आहे. १४ ते २० नोव्हेंबर बालहक्क सप्ताहानिमित्त पुणे शहरामध्ये बालहक्क कृती समितीतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बालहक्कांचे संरक्षण व प्रसार यासाठी गेल्या तीस वर्षांपासून समिती कार्यरत आहे. यावर्षी १८ वर्षांखालील बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दि. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रोड येथे विविध कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहील.
पुण्याच्या विविध भागातील वस्ती पातळीवरील व शाळांमधील मुला-मुलींनी काढलेली चित्रे, तसेच पर्यावरण व प्रदूषण या विषयाशी संबंधित काही छायाचित्रे याठिकाणी पहावयास उपलब्ध असतील. बालहक्कांचा इतिहास व सद्यस्थिती, तसेच बालकांच्या संरक्षण व सहभागासाठी योगदान देण्याच्या विविध संधींबाबत याठिकाणी माहिती मिळू शकेल.
तसेच, या कालावधीमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून वस्तीपातळीवरील मुलांसाठी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडीया) येथे काही आंतरराष्ट्रीय व प्रसिद्ध चित्रपटांचे विशेष प्रदर्शन (स्क्रिनिंग) आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुला-मुलींना जागतिक स्तरावरील विषय व त्यांची सिनेमाच्या माध्यमातून मांडणी याविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, नागरी सुविधा व समस्यांबाबत युवकांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद व इतर संस्था पातळीवरील उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बालमजुरी व बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन, अत्याचार व शोषणापासून बालकांचे संरक्षण, आणि सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, अशी उद्दीष्टे घेऊन बालहक्क कृती समिती काम करत आहे.