सांगली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिराळा येथे ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला.
निनाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळ, यशस्विनी फौंडेशन व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत उजास फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त ग्रामीण विभागातील १० ते १६ वयोगटातील मुली तसेच महिला यांच्या आरोग्य, सामाजिक, आर्थिक अशा सर्वांगीण विकासासाठी व्यवस्थापन अंतर्गत सर्व माहिती देणे, सॅनिटरी नॅपकिन वाटप करणे तसेच स्त्रियांच्या विविध आजाराबाबत मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मुलींना याबाबत प्रत्यक्ष काही शाळेत जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास उजास फौंडेशनच्या अध्यक्षा अद्वितेशा बिर्ला, यशस्विनी फौंडेशन च्या सहसंस्थापिका साईतेजस्वी देशमुख, निनाई शिक्षण संस्था सचिव रेणुकादेवी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.