सांगली : निर्मिती सखी मंच, वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द व जायट्स ग्रुप ऑफ वारणा ऐतवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ऐतवडे व परिसरातील उद्यमशील व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या यशस्वी महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सोनाली नवांगुळ या उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मिती सखी मंचच्या संस्थापिका डॉ. प्रज्ञा पाटील या होत्या.
सामान्य परिवारामध्ये राहूनही असामान्य कर्तृत्वाद्वारे आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा सामाजिक दर्जा उंचावणारया महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. गेली पाच वर्ष निर्मिती सखी मंचच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कर्षासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीसाठी परिसरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जात असून यासाठी परिसरातील महिलांनी या निर्मिती सखी मंचच्या परिवारामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी डॉ. प्रज्ञा पाटील यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सोनाली नवांगुळ म्हणाल्या,” महिला स्वतः सक्षम असून त्यांनी आपल्यातील ऊर्जा ओळखणे गरजेचे आहे. यावेळी परिसरातील अनेक दिव्यांग महिलांनी आपल्या अपंगत्वावर मात करत स्वतः चा सामाजिक क्षेत्रात दर्जा उंचावला असल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. स्वतः अपंग असूनही अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत असताना साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, हे सांगताना आपण आपल्या स्वतःच्या अपंगत्वावर कशी मात केली हे सांगत आपला जीवनप्रवास उलगडला.
यावेळी जायट्स फेडरेशनच्या माजी अध्यक्षा डॉ. सुवर्णा माळी जायट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर पर्लच्या अध्यक्षा मानसी साळुंखे, अपर्णा माळी, शीतल साळुखे यांचेसह निर्मिती सखी मंचच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रारंभी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि सन्मान समारंभ पार पडला. यावेळी निर्मिती सखी मंचच्या सर्व सभासदांना भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रज्ञा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मनीषा संकपाळ यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. प्रज्ञा कांबळे यांनी करून दिली तर सूत्रसंचालन सुवर्णा आवटे व भारती पाटील यांनी केले. यावेळी निलेवाडी, कुंडलवाडी, कुरळप चिकुर्डे परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.