नुकताच मी सामाजिक पर्यटन व अभ्यासदौरा करण्यासाठी नगर येथील स्नेहालय संस्थेला भेट दिली. या ठिकाणी डॉ. गिरीष कुलकर्णी या ध्येयवादी सामाजिक कार्यकर्त्याने वंचित घटक, निराधार बालक व असाध्य रोगांना बळी पडलेल्या व्यक्तीसाठी जे नंदनवन उभारले आहे. ते पाहून मानवतावादी पध्दतीने किती खोलपर्यंत काम करता येते, याचा जिता जागता आदर्श पाहता आला.
डॉ. गिरीष कुलकर्णी म्हणजे स्नेहालय व स्नेहालय म्हणजेच डॉ. गिरीश कुलकर्णी हे समीकरण एकदम फिट्ट मनात ठसले आहे. खरेतर सह्दयी अभिनेते अमिर खान यांच्या सत्यमेव जयते या टि वी शोमधून स्नेहालयचे काम प्रथम समजले. या संस्थेस अमीर खान यांनी स्व:ता तर मदत केली आहे परंतु, त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची मदत स्नेहालयला झाली. स्नेहालयचा निराधार बालकांचा प्रकल्प, लालबत्ती विभागात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे मुले, अत्याचारीत व पिडीत महिला, एड्सबाधित व्यक्तींचा प्रकल्प असो,असे अनेक वंचित, उपेक्षित व पिडीत घटकांवर स्नेहालयाचे काम लाखमोलाचे आहे. यामुळे माणुसकी वरील विश्वास अधिक दृढ होत आहे. समाज जसे खलप्रवृतीचे, नराधम, क्रूर लोक आहेत तसेच स्नेहालय व डॉ.कुलकर्णी सारखे सहृदयी, मानवतावादी व सज्जन लोक आहेत. हे या निमित्ताने अनूभवास मिळाले.
समाजात योग्य, प्रामाणिक व सत्य रूपाने काम केले तर त्यास मदतीचा प्रचंड ओघ होतो हेही याठिकाणी दिसून आले. कारण दानदाते लोकांना जर कामामागील तळमळ समजली तर निधी व पैशाची गरज कधीच कमी पडत नाही. आज स्नेहालयचे काम फक्त नगर जिल्ह्यात व शहरापुरते न राहता पुणे, मुंबई, बेळगाव, नागपूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. स्नेहालय हे चांगल्या व्यक्ती, कार्यकर्ते व चांगला विचार तयार करणारा कारखानाच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आजच्या काळात देश, देव, धर्म व जातीच्या नावाने एकमेकांचा जीव घेतला जात आहे.परंतू स्नेहालयचे काम यासर्व बाबीच्या पलिकडे जाणारे आहे.
ज्या व्यक्तींना समाजात काही नवे पाहायचे आहे. पेरायचे आहे. नवे काही उभे करायचे आहे किंवा मानवता अनुभवायची आहे. त्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी स्नेहालयास भेट दिली पाहिजे. लाखो रूपये खर्च करून काल्पनिक तीर्थयात्रा, समुद्रकिनारा वरील धांगडधिंगा व व्यसने करण्यापेक्षा मानवधर्म वाढवणारे सामाजिक पर्यटन केले तर वेगवेगळ्या प्रकारचे आत्मिक समाधान, वेगळी सहकार्याची दृष्टी व सेवाभावी वृत्ती नक्की गवसेल ही खात्रीने सांगू शकतो.
प्रा.मुनीवर सुलताने,
अग्रणी सोशल फौंडेशन, विटा