पुणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नफा नुकसान आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा याचा काय संबंध आहे? असं मथळा वाचल्यानंतर वाटू शकत. पण घटना अशी घडली की रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले.
त्याचं झालं ते असं, पुण्यातील लोहिया नगर वस्तीमध्ये रज्जाक गफुर शेख हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी सेवा देत होते. करोना आणि टाळेबंदी नंतर अजूनही रिक्षा व्यवसायाने म्हणावी तशी गती घेतलेली नाही. म्हणून त्यांना सकाळपासून फारशी प्रवासी भाडी मिळाली नव्हती. घराजवळ असलेल्या महात्मा फुले पेठेत एक महिला रिक्षात बसल्या त्यांना शेख यांनी सातारा रस्त्यावरील विवेकानंद पुतळ्या जवळ सोडले त्यानंतर भाडे बघत-बघत ते पुन्हा शंकरशेठ रस्त्यावरील एक एकबोटे कॉलनी जवळ आले. तिथे तिथून प्रवासी घेऊन त्यांनी कोंढव्याला सोडले. पुन्हा रिकामी धाव घ्यावी लागली. तोपर्यंत अंधारून आलं होतं. दिवसभराच्या दगदगीने कंटाळून शेख आपल्या घरी परतले. नेहमीप्रमाणे रस्त्यावरच एका कडेला रिक्षा लावून रिक्षावर फडके मारले. प्रवासी बसलेले सीट आणि मागील सामान ठेवायची जागा तपासली आणि ते चमकलेच. तिथे एक पर्स त्यांना दिसली. कुणाची पर्स तिथे राहिली ?आत्तापर्यंत कोणते प्रवासी गाडीत बसले होते ते आठवू लागले. आजही काही फार धंदा झाला नाही. शेवटची दोन भाडी झाली ती त्यांना आठवली. आणि मग त्यांनी पुन्हा गाडी सुरू केली. ते थेट कोंढव्याला जिथं शेवटचं पॅसेंजर सोडलं होतं तिथे गेले. या पॅसेंजरने पैसे सुट्टे करण्यासाठी ज्या ठिकाणी नेलं होतं, तिथे चौकशी केली. त्या महिला पॅसेंजरने ही पर्स माझी नाही असा निर्वाळा दिला. आता दुसरे पॅसेंजर हे सातारा रस्त्यावर एका सोन्याच्या दुकानापाशी सोडलेले होते . तिथं कुठं चौकशी करणार ? निराश मनाने शेख परतले आणि त्यांनी थेट रिक्षा पंचायतीचे कार्यालय गाठले.
गेले वीस पंचवीस वर्ष रिक्षा पंचायतीमध्ये हरवले सापडले सहाय्यता केंद्र सुरू आहे. तेथे रिक्षामध्ये सापडलेल्या वस्तू काही रिक्षाचालक आणून प्रामाणिकपणे जमा करतात. तर जे प्रवासी रिक्षात सामान विसरतात ते आपले सामान परत मिळेल या आशेने या केंद्रात हरवल्याची नोंद करतात . मग रिक्षा पंचायत कार्यालय नोंदवलेल्या घटनेनुसार चौकशी करून ते सामान त्याला परत मिळवून देण्याचा प्रयत्न करते. आजवर रोख लाखो रुपये ,बहुमोल दागिने कित्येक लॅपटॉप, मोबाईल फोन इत्यादी सामान पंचायतीच्या या केंद्र च्या माध्यमातून प्रवाशांना परत मिळाले. रिक्षाचालकांनाही ज्याची वस्तू त्याला मिळेल याचा विश्वास या केंद्राने दिला. शेख पोहोचेपर्यंत पण रिक्षा पंचायत कार्यालय बंद झाले होते. जड पावलाने ते घरी परत गेले आणि सकाळी पुन्हा पंचायत कार्यालयात आले.
पंचायतीचे व्यवस्थापक विजयानंद रांजणे यांनी त्यांना तपशीलवार माहिती विचारून हरवले सापडले केंद्राच्या नोंदणी पुस्तकात सापडलेल्या वस्तूंची आणि घटनेची नोंद केली. पर्स उघडून त्यात अधून मधून व्हायब्रेट करत असलेला ओप्पो कंपनीचा किमती मोबाईल फोन, काही हजार रुपये रोख रक्कम, दोन ओळखपत्रे आणि इतर सामान याची नोंद केली. तोवर रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार हे सामाजिक कार्यकर्ते हाजी नदाफ यांच्यासह कार्यालयात दाखल झाले होते. या सर्वांनी मग सामानाच्या मालकिणीचा शोध सुरू केला.
ओळख पत्रावरून हे सामान रुबीना शेख यांचे असल्याचे स्पष्ट झाले होते. योगायोगाने रुबीना शेख या पंचायत कार्यालया जवळच घोरपडी पेठेत राहणाऱ्या होत्या. आणि त्या महात्मा गांधी मुलींच्या उर्दू विद्यालयाच्या त्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्या आणि त्यांचा मुलगा अरबाज खान धावत पंचायत कार्यालयात आले. मोबाईल आणि पर्स बघून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या म्हणाल्या या पर्समध्ये बरीच रोख रक्कम आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा हा फोन आहे. यामध्ये विविध प्रकारच्या एप्लिकेशन्स मध्ये आमच्या विद्यार्थीनी विषयीची माहिती, अभ्यासक्रम, त्यांना सूचना देण्याविषयीचा कार्यक्रम, या सर्वाचा डेटा याचा समावेश आहे. काल रिक्षात पर्स व मोबाईल हरवल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही. ही सर्व माहिती जर मला परत मिळाली नसती, तर विद्यार्थ्यांचे त्यातही मुलींचे खूप शैक्षणिक नुकसान झाले असते. त्याला जबाबदार शिक्षिका म्हणून मी स्वतःला माफ करू शकले नसते. रज्जाक शेख हे देवदूता सारखे माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी प्रामाणिकपणे हे सर्व आणून दिले. याच्यापुढे पैशाची काही किंमत नाही .अशी व्यवस्था करून ठेवल्याबद्दल रिक्षा पंचायतीचे मी मनापासून आभार मानतो.
यावेळी हाजी नदाफ यांच्या हस्ते रुबिना यांना त्यांच्या वस्तू परत देण्यात आल्या. शेख यांनीही सढळ हाताने शेख यांना बक्षीस दिले. ते स्वीकारायला तयार नव्हते रज्जाक म्हणाले नुकताच रमजानचा महिना झाला. हरामाचं काही स्वीकारायचं नाही. मला मिळालेली शिकवण आहे. दुसऱ्याचं फुकटचं आपल्याला काही नको या शिकवणीने मी या वस्तू परत केल्या.