अहमदनगर : विधवा महिलांच्या संरक्षणासाठी विधान सभेत कायदा होणे गरजेचे आहे त्यासाठी राज्यातील विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थानी एकत्र लढा उभारावा असे आवाहन राज्याच्या विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे जनक प्रमोद झिंजाडे यांनी केले. ते नुकतेच अहमदनगर येथील सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय येथे विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाच्या वतीने आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते.
सदरची कार्यशाळा स्त्री शक्ती फाउंडेशन शेवगाव, सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय अहमदनगर, व नवजीवन प्रतीष्ठान अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सी.एस.आर.डी.समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे होते. या कार्यशाळेसाठी ६० हुन अधिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन करताना झिंजाडे यांनी या अभियानाची व्याप्ती, लोकप्रतिनिधींची भुमिका, पुढील नियोजन व लोकसहभागाची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना झिंजाडे म्हणाले की, ‘या अभियानासाठी मोठी चळवळ उभारावी लागणार आहे. गाव पातळीवर प्रत्येक गावच्या ग्रामसभेत ठराव घेवून स्थानिक आमदारांना कायदयाचा मसुदा तयार करून देवून येणाऱ्या विधान सभेच्या अधिवेशनात मांडण्यासाठी आग्रह धरावा. त्यासाठी विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या विचारवंतांनी एकत्र येवून कायदयाचा मसुदा तयार करावा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांनी समाजकार्य महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात विधवा महिला सन्मान व सरंक्षणाचा समावेश करण्याचा आणि समाजकार्य महाविद्यालयांच्या विद्यार्थांना क्षेत्रकार्या दरम्यान या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी देवुन जनजागृती करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अभियानाचे राज्य समन्वयक राजू सिरसाठ, कालिंदी पाटील, नाशिक चे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अशोक कुटे, एच. पी. जामखरे यांनी आपली मते मांडली. या कार्यशाळे दरम्यान विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाचे जनक प्रमोद झिंजाडे यांचा नवजीवन प्रतिष्ठान च्या वतीने सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अशोक कुठे, वसंत साबळे, बाबामियाँ सय्यद, बाबासाहेब वाघ, शोभा काळे, यशोदा पर्वतकर, इत्यादी सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केले. प्रास्ताविक नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार यांनी केले तर सुत्रसंचालन स्त्री शक्ती फाऊंडेशन चे प्रथमेश सोनवणे यांनी केले.