ठाणे : संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध आश्रमशाळा, वसतिगृहात संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी प्रभातफेरीत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी तथा जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, सहायक आयुक्त समाधान इंगळे, तहसीलदार राजाराम तवटे, लेखाधिकारी सुनीता पवार यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ व स्व वसंतराव नाईक महामंडळ यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या ठाणे व कल्याणमधील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उल्हासनगर मधील मागासवर्गीय गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथ मधील ज्योतिबा फुले आश्रमशाळेत प्रभात फेरी तसेच भारताचे संविधान उद्देशिका वाचन व अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
बदलापूर मधील कात्रप पाडा येथील कै. निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रम शाळेत भारतीय संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी तसेच भारताचे संविधान उद्देशिका पत्रिकेचे वाचन करून संविधान उद्देशिका पत्रिकेचे अनावरण व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील निवासी व अनिवासी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शहापूर येथील मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे संविधानाचे महत्व विशद केले.