बीड : महिलांनी मासिक पाळीत स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर संसर्ग आजार होण्याची शक्यता असते. महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्या सॅनिटरी पॅड वापरू शकतात. काही कष्टकरी महिलांना सॅनेटरी पॅड विकत घेण्यासाठी जवळ पैसे नसतात. अशा महिला पॅडसाठी पैसे खर्च करु शकत नाहीत. या महिलांचा विचार करत महासांगवी ता. पाटोदा येथील दीपक गर्जे या युवकाने मोफत कापडी सॅनिटरी पॅड निर्मिती करत ते मोफत पुरवण्याचे काम हाती घेतले आहे.
सावली संस्थेद्वारे गेल्या दशकभरापासून सामाजिक कार्य करत असलेल्या दीपकला मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलीमा मिश्रा यांनी काही महिन्यांपूर्वी पाच इलेक्ट्रीक मशीन भेट दिल्या. याच मशीनचा वापर करत दहा महिलांना रोजगार देऊन हे कापडी सॅनिटरी पॅड बनवले जातात. एक पॅड शिवला की अडीच रुपये संबंधित महिलेस मिळतात. भटक्या समाजाच्या वस्तीवर तसेच कष्टकरी व गरजू महिलांच्या वास्तव्याची ठिकाणं शोधून गर्जे व सहकारी हे पॅड महिलांपर्यंत पोचवतात. यासह मासिक पाळी स्वच्छतेविषयी मार्गदर्शनही करतात. आतापर्यंत २०० हून अधिक महिलांना या पॅडचे वितरण करण्यात आलेले आहे.
या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता दीपक या कामाचा अधिक विस्तार करणार आहेत. या कापडी पॅडचे वैशिष्ट्य म्हणजे हे वापरण्यास अगदी सुरक्षित व सुलभ आहेत. एक पॅड किमान १५ वेळा निर्जंतुकीकरण करून वापरता येऊ शकते. शिवाय कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक या पॅडमध्ये नसल्याने पर्यावरणासाठीही ते पूरक ठरते. ‘महिलांचे आरोग्य जपणे व पर्यावरणाची काळजी’ या दुहेरी हेतूने आपण या पॅडची निर्मिती करत असून संस्थेकडील स्व:निधीतून सध्या हा खर्च केला जात आहे. दात्यांची मदत घेऊन संपूर्ण मराठवाड्यातील गरजू महिला, युवतींपर्यंत हा उपक्रम पोचवणार आहोत,’ असा मनोदय दीपक व त्यांचे सहकारी यांनी व्यक्त केला आहे.