दिवाळी हा प्रकाशाचा सण. एका नवीन पर्वाचा प्रारंभ असलेला हा दीपोत्सव, प्रकाशाचा अंधारावर तसेच सत्याचा असत्यावर विजय म्हणून देशभरात अतिशय उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. अतिशय सुंदर पध्द्तीने सजवलेली घरे व रस्ते उत्सवाचे वातावरण निर्माण दर्शवतात. भारत देशात अजूनही कोरोनाचे सावट आहे व अजूनही परिस्थिती पूर्ण सामान्य झालेली नाही. याच धर्तीवर सेफ किड्स फाउंडेशनद्वारे सर्व नागरिकांना व विशेष करून लहान मुलांना ही दिवाळी सुरक्षित पध्द्तीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वर्षीच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आग व भाजणे या विषयाबाबत जागरूकता निर्माण करून पुणे शहरात आगीच्या घटना टाळण्यासाठी फटाके सुरक्षा या विषयावर आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील ९ शाळांमधून ६७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अतिशय भरीव कामगिरी करत अमुल्या अरविंद खारमाटे (इ. ५ वी, जयवंत पब्लिक स्कुल) हिने प्रथम, पिंकी देवराम चौधरी (इ. ८ वी, सिग्नेट पब्लिक स्कुल) हिने श्रुतिका संतोष शिंदे (इ. ७ वी सिग्नेट पब्लिक स्कुल) हिने अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले.
दिवाळीदरम्यान आग व भाजण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय न पाळता फटाके पेटवणे हे होय. म्हणून सर्वांनी पुढील सुरक्षा संदेशांचा वापर करूनच फटाके पेटवण्याचा आनंद घ्यावा व आग आणि भाजण्याच्या घटनास आळा घालावा असे आवाहन सेफ किड्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे.
- लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीतच फटाके पेटवण्यास प्रारंभ करावा व घरापासून दूर मोकळ्या मैदानात जाऊन फटाके पेटवावे.
- एकदा न पेटलेला फटाका पुन्हा पेटवण्यात धोका असतो म्हणून तसे करणे टाळावे.
- हातात फटाके पेटवणे अतिशय धोकादायक असते म्हणून लांब काठीने दुरून फटाका पेटवावा.
- सुटी व घट्ट कपडे घातल्यास कपड्यांना आग लागण्याचा धोका कमी होतो याचे नेहमी भान ठेऊन ढगळ व सिंथेटिक कपड्यांचा फटाके पेटवतांना वापर टाळावा.
- आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक बादली पाणी व एक बादली रेती नेहमी सोबत तयार ठेवावी.
- मोकळ्या जागी फटाके पेटवावे. इमारतीच्या किंवा विद्युत खांबाजवळ अथवा वाहनतळाजवळ फटाके पेटवू नये.
- सुंदर व प्रकाशित पणत्या, मेणबत्त्या अथवा दिवे इत्यादी पडदे, लाकडी साहित्य अथवा पेट घेणाऱ्या वस्तूंपासून दूर ठेवाव्यात. घरातून बाहेर जातांना पणत्या, मेणबत्त्या अथवा दिवे विझवल्यास आग लागण्याचा धोका संभवत नाही.
ही सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे कडकपणे पालन करून या वर्षीची दिवाळी ही सुरक्षित व आनंदी दिवाळी म्हणून साजरी करूया.
या प्रसंगी बोलतांना संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या की, “सेफ किड्स फाउंडेशनद्वारे वर्षभर अग्निसुरक्षा बाबत जनजागृती केली जाते व आतापर्यंत अकरा लाख बालकांना व पालकांना अग्निसुरक्षा या विषयात प्रशिक्षित केले आहे. या वर्षीसुद्धा संस्थेने ऑनलाईन जनजागृती अभियान राबवत विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये संवेदनशीलता निर्माण केली आहे. एकूण ४७ शाळा व महाविद्यालयांमध्ये सदर जागृती अभियान राबवण्यात आले. एकही आग व भाजण्याची दुर्घटना होऊ न देणे व एकही बालक आगीच्या दुर्घटनेस बळी पडू नये हे संस्थेचे उद्देश आहे. संस्थेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आवश्यक ते सर्व सुरक्षा उपाययोजना पाळून या वर्षीची दिवाळी ही सुरक्षित व आनंदी दिवाळी म्हणून साजरी करावी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.”