सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वसा आणि वारसा निष्ठेने जपल्याबद्दल दत्तक मुलांसाठी मोठे काम करणाऱ्या अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेमार्फत डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार सातारा येथील अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रशांत पोतदार यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये १० हजार व स्नेहालय मधील लाभार्थींनी बनवलेली कलाकृती, पुस्तके आणि सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बुधवारी दि. १५ जून रोजी ग्राम इसळक, जि. अहमदनगर, येथील अनामप्रेम संस्थेच्या जयते ग्राम प्रकल्पात दुपारी १.३० वा. आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबा आमटे यांचे जेष्ठ सहकारी, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आणि मुंबई येथील आनंदवन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री आणि सौ. मेस्त्री यांच्या हस्ते देण्यात येईल. देशातील नव्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी म्हणून रस्त्यांवरील बेवारस मनोरूग्णासाठी देशात पथदर्शी काम करणारे चिखली, जि. बुलढाणा, येथील सेवा संकल्प संस्थेचे संस्थापक डॉ. नंदू पालवे प्रमुख उपस्थित असतील.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे १९९१ ते १९९५ पर्यंत स्वीय सहाय्यक ते आजपर्यंत गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रात अंनिसच्या विविध पदांवर सक्रियपणे मोठे काम प्रशांत पोतदार यांनी केले आहे. महाराष्ट्रातील देव – धर्माच्या नावाने फसवणूक करणाऱ्या अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश करणे असेल अथवा शाळा, महाविद्यालये, गाव वस्त्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे हजारो कार्यक्रम प्रात्यक्षिकासह त्यांनी सादर केले असून हे कार्य अविरत करत राहणे ही त्यांची जीवननिष्ठा ठरली आहे. सध्या ते सातारा येथून म. अंनिसचे मध्यवर्ती कार्यालयातून राज्य कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून सक्रियपणे कार्यभार सांभाळत आहेत. संस्थेचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, संतोष धर्माधिकारी व अजय वाबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे पुरस्कार घोषित झाल्याचे कळवले आहे.