पुणे : स्त्री मुक्ती संघटने तर्फे महात्मा फुले विद्यालय, हडपसर येथे दहावी नंतर काय सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ८० विद्यार्थी व २० पालक उपस्थित होते. यावेळी प्रा. विजय नवले यांनी मार्गदर्शन केले.
दहावी झाल्यानंतर पुढे काय करावे हा बऱ्याच मुलांमध्ये संभ्रम असतो. अशा वेळी काय केले पाहिजे याबद्दल नवले यांनी स्वतःचा अनुभव सांगितला तसेच स्वभावाचा आणि करिअरची निवड करताना काय संबंध आहे. करियर म्हणजे एखादी गोष्ट मनापासून आणि आवडीने करणे हे स्पष्ट करून सांगितले. यावेळी त्यांनी लहान कालावधीत करता येण्यासारख्या कोर्सेसची माहिती दिली. विकास गवळी यांनी विविध शिष्यवृत्ती बद्दल तर श्रावस्ती गाडे यांनी १७ नंबर फॉर्म व रिपीटर व्यवस्था याविषयी माहिती दिली तसेच संदीप निकम यांनी शिक्षणामध्ये कागदपत्रांचे महत्त्व सांगितले.
यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रकल्प समन्वयक मुक्ता शिंगटे उपस्थित होत्या. शितल अंकुश यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर स्वप्नाली लावंड यांच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमित घाडगे यांनी आभार मानले.