आपल्या कामाची दखल घेत, त्याचा सन्मान केला जावा. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तो हातात मिळावा. यापेक्षा दुसरा आनंद नाही. हा पुरस्कार कायम ऊर्जा देणारा असून यापुढे आणखी चांगलं काम करण्यासाठी बळ देणारा आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, भारतातील पहिल्या तृतीयपंथी पत्रकार “झोया लोबो” यांना, “बाईमाणुस” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या. ट्रान्स थॉट संस्थेच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
माझी कोणीतरी दखल घेत आहे, ही भावना अफाट आहे. असे लोबो म्हणाल्या, यावेळी त्यांच्या सोबत काम करणारे त्याचे सहकारी आणि पत्रकार मित्र उपस्थित होते. केवळ तृतीयपंथी वर्गाच्या मागे उभे न राहता, त्यांच्या सोबत उभे राहून आम्ही त्यांच्या न्याय हक्कांसाठी – त्यांच्या अभिमानासाठी – स्वाभिमानासाठी अजून ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करू, असे मत ट्रान्स थॉट च्या टीमने व्यक्त केले. तर, तुम्ही तुमच्यातली ‘बाई’ श्वासामध्ये उतरवत आणि तुमच्यातला ‘माणूस’ जाणिवेमध्ये पेरत, भारतातले पहिले तृतीयपंथी पत्रकार होण्यासाठी केलेल्या प्रवासाचा आदर करत, Trans Thought चा यंदाचा ‘बाईमाणुस सन्मान २०२२’ तुम्हाला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्यातली ‘बाई’ आणि ‘माणूस’ दोघेही अबाधित राहो, अशी मनोकामना राहुल सिद्धार्थ साळवे, राजेश मोरे आणि दीपक सोनवणे यांनी व्यक्त केली.