यवतमाळ : जिव्हाळा संस्थेने “जिव्हाळा कन्यादान” उपक्रमाअंतर्गत विडूळ ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील आरतीच्या विवाहासाठी लोकसहभागातून संसार उपयोगी साहित्य भेट देऊन कन्यादान केले. संस्थेच्या वतीने आत्तापर्यंत ७० कुटुंबाला विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून भेटवस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अतिशय गरीब निराधार असलेल्या कलावती कटके यांची मुलगी आरती राजेश कटके यांच्या विवाहनिमित्त संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. कलावती कटके यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. भूमिहिन असल्यामुळे त्यांना इतरत्र काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संसार आणि व्यवहार याचा ताळमेळ बसवताना कुटुंबप्रमुख म्हणून कटके यांची ओढाताण आहे. मुलीच्या लग्नाची तारीख जवळ येत असल्याने त्यांची काळजी अधिकच वाढली. हीच बाब गावातील जि. प. शिक्षिका व जिव्हाळा संस्थेच्या सल्लागार संगीता मांजरे (मादावार ) यांनी संस्थेचे अध्यक्ष अतुल भाऊ मादावार यांच्या कानावर घातली. जिव्हाळा संस्थेने सदरील परिस्थिती लक्षात घेऊन आरती हिच्या विवाहानिमित्त भेटवस्तू देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
संस्थेच्या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. जि. प. शिक्षिका व जिव्हाळा संस्थे च्या सल्लागार संगीता मांजरे (मादावार ) यांच्या हस्ते आरती राजेश कटके हिला संसारोपयोगी भांड्याचा संच भेट देण्यात आला. उमरखेड तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार देऊळगावकर, उमरखेड हरी सुपर मार्केटचे संचालक अक्षय माने, संगीता मांजरे (मादावार ), न्यायालयीन कर्मचारी नवघरे बाबू, प्रमोद आहेर आदी दानशूर मान्यवरांच्या आर्थिक सहयोगातून एकूण ५१ संसारोपयोगी साहित्याचा संच भेट देण्यात आला.
मागील सात वर्षांपासून विविध संस्था आणि दानशूर मान्यवरांचे माध्यमातून निराधार, अत्यंत गरजू आदी ७० कुटुंबातील मुलींना संसारोपयोगी साहित्य देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार यांनी सांगितले. समाजाभिमुख नाळ शाश्वत ठेवण्यासाठी दानशूर व्यक्तीने पुढे येण्याची आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी विडूळ येथील पोलीस पाटील गजानन मुलंगे , जिव्हाळा संस्थे
चे अतुल लता राम मादावार, चंद्रकांत खेवलकर, श्रीकांत शहा, मुलीची आई कलावती कटके आदी उपस्थित होते.