पुणे : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात पुण्यासह बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, मुळशी, वेल्हा, शिवनेरी व सर्व गड-किल्ले तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या निरंजन सेवाभावी संस्थेच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सन्मान व शपथ सोहळा नुकताच पार पडला.
संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. नवनीत मानधनी यांची निवड झाली आहे. तर, सचिवपदी सीए दुर्गेश चांडक यांची नियुक्ती झाली. पुढील तीन वर्षांसाठी ही निवड झाली असून संस्थेच्या नारायण पेठेतील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर कलंत्री, महेश सोमाणी, शामसुंदर पोफलिया आदी उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शपथ दिली व मार्गदर्शन केले.
नव्या आर्थिक वर्षाकरीता उपाध्यक्षपदी सीए विशाल राठी, आनंद कासट यांसह सहसचिव मुकेश माहेश्वरी, खजिनदार स्वप्निल देवळे, जनसंपर्क अधिकारी व नियोजन समिती प्रमुखपदी विशाल सारडा तसेच धीरज धूत, विराज तावरे यांची कार्यकारिणीमध्ये निवड झाली असून ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ. नवनीत मानधनी म्हणाले, संस्थेतर्फे वर्षभरात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याकरीता विविध समित्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. पुढील काळात गरजू, उपेक्षित व वंचित घटकातील मुलांसह ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी संस्था प्रामुख्याने कार्यरत राहणार आहे. याशिवाय विद्यार्थी पालकत्व योजना, डिजीटल क्लासरुम, शाळेत शुद्ध व थंड पाणी जलकुंभ, डिजिटल शाळा उभारणी, सायकली प्रदान, अनाथ मुलांकरीता आंबे खाणे स्पर्धा, विशेष मुलांचा दांडिया असे विविध उपक्रम देखील सामाजिक संस्थांकरीता राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमोदकुमार जाजू यांनी सूत्रसंचालन केले. विराज तावरे यांनी आभार मानले.