सांगली : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आपत्ती व्यवस्थानाचे आराखडे तयार करत असताना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था व धोरणात्मक सुचना करणाऱ्या सामाजिक संस्थांची स्वतंत्र वेगवेगळी यादी करण्यात यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन बैठकांना अशा संस्थांना निमंत्रित करण्यात येवून त्यांच्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोरोनाबाधितांना मदत आढावा बैठक उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुढेवार, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितिन कापडनीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योति देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संभाव्य पुरपरिस्थिती पुर्वी पुरक्षेत्रातील नागरिकांना ग्रामस्थांना पुरपरिस्थितीत आवश्यक असणाऱ्या वस्तुंच्या यादीबाबत प्रशासनाने आवगत करुन त्यांना कोणत्या वस्तु घरात ठेवाव्यात याबाबत जनजागृती करावी असे आदेशित करुन उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी पुरपरिस्थितीत अधिकाऱ्यांनी अधिक सजगपणे काम करावे. असा सल्ला यावेळी दिला. पुरपरिस्थितीच्या काळात अफवा पसरु नयेत यासाठी योग्य ती खबारदारी घेण्यात यावी. तसेच जलसंधारण विभागाच्या पावसाच्या अद्ययावत माहितीसाठी जलसंपदा विभागाचे RTDAS ॲपचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असल्याचे सांगून शहरात पॅचवर्क चे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी मुरूमाचे रस्ते करण्याची कार्यवाही सुरू आहे. धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. विभागनिहाय २४*७ पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात सुमारे ९२ असून यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांचीही निश्चिती करण्यात आली असल्याचे सांगून आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, शहरात आपत्ती मित्र ही संकल्पना राबविण्यात येत असून या अंतर्गत आत्तापर्यंत २०० जणांनी आपत्ती मित्र म्हणून नोंदणी केली आहे. तसेच आपत्ती मित्र ॲप ही महापालिकेकडून तयार करण्यात आले आहे. या ॲपवर महापालिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.