सातारा : गुणवत्तापूर्ण पोलीस प्रशिक्षणासाठी सर्वश्रुत असलेल्या खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींसाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये एकूण चाळीस पोलीस अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत अग्निआपत्ती प्रतिबंध व नियंत्रण याबाबत प्रशिक्षण घेतले.
पुणे येथील व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते व जीवन संरक्षण कौशल्य प्रशिक्षक मिलिंद धनाजी गुडदे यांनी देशात घडलेल्या आगीच्या घटनांचे विश्लेषण, कृतिगीते, खेळ व अभिनव उपक्रमांचा आधार घेऊन अतिशय मनोरंजक पद्धतीने या क्लिष्ट विषयाबाबत सखोल मार्गदर्शन केले. घरात व कामाच्या ठिकाणी आगीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत संवेदनशीलता निर्माण केली तसेच अग्निरोधक यंत्राच्या (फायर एक्स्टिंगयुशर) वापराचे प्रात्यक्षिक करून दाखवले व प्रशिक्षणार्थींनी स्वतः प्रात्यक्षिक करत आग विझविण्याचा सराव केला.
याप्रसंगी बोलतांना पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य शशिकांत बोराटे म्हणाले की, खंडाळा स्थित पोलीस प्रशिक्षण केंद्राद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व जनतेच्या रक्षणासाठी मुख्य कायदे, फौजदारी लघु कायदे, पोलीस संघटन व कार्यपद्धती, कायदा व सुव्यवस्था, न्यायसहाय्यक विज्ञान, तंत्रज्ञानाधारित गुन्हे तपास व अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर यासह अनेक विषयांचे दर्जेदार व सर्वंकष प्रशिक्षण दिले जाते. या विषयांसोबतच अग्निसुरक्षा या विषयात पोलीस दल प्रशिक्षित असल्यास आगीच्या घटनांमध्ये होणारी प्राणहानी व वित्तहानी टाळण्यासाठी पोलीस सक्रिय सहभाग घेऊ शकतील याबाबत खात्री आहे.
सदर प्रशिक्षण उपप्राचार्य डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी रा. पो. निरीक्षक रवींद्र कोळी, रा. पो. निरीक्षक संजय पऱ्हाड. रा. पो. उपनिरीक्षक संजय शिंदे, रा. पो. उपनिरीक्षक गुलाब पाटणकर, रा. पो. उपनिरीक्षक सुखदेव भोगील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे यांनी परिश्रम घेतले.











