मुंबई : धम्मरत्न बुद्धविहार कमिटीने बुद्धपौर्णिमेनिमित्त मिरा-भाईंदर येथे सांस्कृतिक कार्यक्रमासोबत आभा परिवर्तनवादी संस्थेचा “जागर संविधानाचा” या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महिला, पुरुष यांच्या सोबतच मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
संत महापुरुषांचे समाज प्रबोधनाचे विचार, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे विचार संविधानाच्या माध्यमातून आपल्या रोजच्या जगण्यात आपण कसे अंगी बाळगू शकतो आणि एक माणूस, एक समाज, एक देश म्हणून आपण कसे समृद्ध होऊ शकतो हे या संविधानाच्या संवादात चर्चा करण्यात आली. या प्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
हा संवाद व हा उपक्रम खेळीमेळीचा व्हावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांना, तसेच जमलेल्या इतर लोकांना खेळ आणि इतर गोष्टीत सहभागी करून घेऊन आभाचे कार्यकर्ते प्रतिक मोहिते आणि रोचना विद्या यांनी लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात संविधानाचे किती महत्व आहे हे पटवून दिले.
या सोबतच धम्मरत्न बुद्धविहार कमिटीच्या ग्रंथालयाला ‘संविधान ग्रेट भेट’ हे संविधानाची गोष्ट सांगणारे पुस्तक भेट देण्यात आले. आभाचा हा संविधानाचा जागर जास्तीत जास्त लोकांमध्ये घडून यावा अशी उपस्थितांनी अपेक्षा व्यक्त केली.
बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती किंवा इतर कोणत्याही महापुरुषांची जयंती हा उत्सवाचा दिवस असतो त्या दिवशी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम करतो, पण हा उत्सव विचारांचा व्हावा असा आभाचा संस्थेचा मानस आहे. आगामी काळात जास्तीत लोकांपर्यंत संविधान सोप्या भाषेत पोहचविण्याचे आमचे ध्येय असल्याचे आभा संस्थेचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.







