चंद्रपूर : महाराष्ट्रात वाचन संस्कृती जपण्यासाठी जागृत युवा मंचने ‘गाव तेथे वाचनालय’ मोहीम हाती घेतली आहे. आज इंटरनेटचया युगात जग प्रगती पथावर आहे. WhatsApp, Facebook, twitter सारखे सामाजिक उपकरण वेग धरू पाहत आहे. अशातच कुठेतरी वाचन संस्कृती लोप पावत असताना दिसते. आजची तरुण पिढी मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जात आहे. त्यामुळे माणसांवर अनेक दुष्परिणामही जाणवतात. म्हणून सामजिक भान जोपासत. जागृत युवा मंचने स्वखर्चातून चंद्रपूर येथील बाबुपेठ परिसरात वाचनालयाची निर्मिती केली आहे.
जुनी-नवी पुस्तके भेट देऊन या उपक्रमासाठी मदत करण्याचे आवाहन जागृत मंचच्या वतीने करण्यात आले होते. वर्षा फाऊंडेशन नागपूरच्या वतीने अनेक नवी-जुनी पुस्तकांची मदत या उपक्रमासाठी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पुस्तके बघून चाळीतील मुलांनी आनंद व्यक्त केला. कुतूहलाने मुलांनी त्या पुस्तकांना चाळून बघितलं. त्यावरून मुलांना वाचनाची आवड दिसून आली. वाचनालयात कथा संग्रह, काव्य संग्रह, शैक्षणिक पुस्तकांचा सामावेश करण्यात आला असून रोज सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत हे वाचनालय सुरू राहणार असल्याची माहिती जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर यांनी दिली.
उपक्रमाचे उद्घाटन वर्षा फाऊंडेशनच्या संचालिका वर्षा परचाके यांच्या हस्ते पार पडले. प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, कविता पोपरे, सुनिल खिल्लारे, वैष्णवी खिल्लारे, सौरभ भागडे, अंकिता खोके आदी उपस्थित होते.
तुमच्या घरातील कपाटात अवांतर वाचनाची अथवा स्पर्धा परीक्षेची नवीन जुनी पुस्तके धूळ खात पडली असतील. ती पुस्तके तुम्ही रद्दीत विकू नका. ती जागृत युवा मंचच्या टीमला दया, आम्ही ती पुस्तके गरजूना वाचायला देऊ. चंद्रपूर- गडचिरलीसारख्या आदिवासी जिल्ह्यातील गावा -गावात ‘ गाव तिथे वाचनालय’ स्थापन करून वाचन संस्कृती जोपासण्याचे जागृत युवा मंचचे ध्येय आहे अशी माहिती राहुल पेंढारकर, अध्यक्ष जागृत युवा मंचातर्फे देण्यात आली आहे.