अहमदनगर : स्नेहालय संस्थेच्या वतीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ व १५ जून रोजी अहमदनगर येथे सद्भावना युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेहालय परिवारातील अनामप्रेम, विद्यार्थी सहाय्यक समिती श्रीगोंदा, स्नेहप्रेम कर्जत, उचल फाउंडेशन, शेवगाव या संस्था या शिबिराचे संयोजन करीत आहेत.
या सद्भावना युवा शिबिरात सामूहिक श्रमदान, सेवाकार्याच्या नव्या दिशा आणि देशातील सद्भभावनेचे आव्हान या विषयांवरील गटचर्चा होणार आहेत. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वटवाणी, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री नीलिमा मिश्रा, समाजसेवक नरेंद्र मिस्त्री यावेळी युवकांशी संवाद करणार आहेत. स्नेहालयाच्या सेवा प्रकल्पांना भेटी, विविध स्थानिक गरजेनुसार असे प्रकल्प आपापल्या ठिकाणी सुरू करण्यासाठीचे मार्गदर्शन यावेळी स्नेहालयमधील विविध प्रकल्प प्रमुख करणार आहेत.
हे दोन दिवसीय युवा शिबिर मानसग्राम प्रकल्प इसळक ता. अहमदनगर येथे होणार आहे. सद्भावना युवा शिबिर संयोजन समितीमध्ये संतोष धर्माधिकारी, दीप्ती नीरज करंदीकर ॲड. श्याम आसावा, गायत्री थोरात, प्रा. श्रेयस रामदासी, हनीफ शेख, अजित कुलकर्णी, अजित माने, अनिल गावडे, प्रवीण मुत्याल, पुजा पोपळघट, नितीन वावरे, अब्दुल खान, प्रा. विपुल धनगर, अजय शेळके, आदी कार्यकर्ते आहेत.