अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील राज व शीतल यांचा परिवर्तनवादी विवाह सोहळा संपन्न
अमरावती (तिवसा) : शहरातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राज माणिकराव माहोरे व शीतल यांचा परिवर्तनवादी विवाह सोहळा समर्थ लग्न सभागृहात संपन्न झाला. यावेळी वर वधूंनी संविधानाची उद्देशिका व सत्यशोधक पद्धतीने सहजीवनाचे शपतपत्र वाचून लग्नाची गाठ बांधली. अगदी साध्य पद्धतीने बडेजावाला फाटा देत राज व शीतल यांच्या परिवर्तनवादी विवाह सोहळ्याची शहरात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शपथा सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना मान देऊन प्रथा परंपरा मोडून अगदी साधे पणाने झालेल्या राज व शीतल यांचा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्याला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींना हजेरी लावली होती.
या विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिकेतून कुठलीही भेट वस्तू न देता पुस्तकाचे दान करावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत अनेकांनी वर वधूंनी पुस्तक भेट दिली. ही सर्व पुस्तके शहरातील शाहू महाराज वाचनालयाला दान स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राज माहोरे यांनी दिली.
कोरोना महामारी काळापासून आपल्याला दिसून येते कि, साध्या पद्धतीने, कर्मकांड पूजा अर्चा काही न करता सध्या विवाह पार पडत आहेत. परंतु याही पलीकडे जाऊन महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परिवर्तन विवाह सोहळा तिवसा शहरात संपन्न झाल्याने एक आदर्श विवाह सोहळा म्हणून या विवाहाकडे पाहिले जात आहे.