कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपळगाव ता. भुदरग येथे ऐतिहासिक विशेष ग्रामसभा पार पडली. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी व गावातील बहुतांश महिलांनी या ग्रामसभेचे नियोजन केले होते. या प्रसंगी विशे. मार्गदर्शिका म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ऍड. दिलशाद मुजावर उपस्थित होत्या.
मुजावर यांनी उपस्थित महिला व मुली, ग्रा.प. सदस्य, शिक्षक, मंडळ अधिकारी अंजली धादनकर, अनेक पुरुष मंडळींच्या उपस्थितीत बाल विवाह पिंपळगाव येथे होणार नाही अशी शपथ दिली. तसेच विधवा प्रथा बंद व विधवांना ‘पुर्णांगिणी’ या अलंकाराने संज्ञेने बोलावले जावे व त्यांचे सौभाग्याचे अलंकार व लेणं समाजाने परिवर्तनाचा नवा पायंडा म्हणून पतीच्या निधनानंतर ही तसेच राहू द्यावे असे आवाहन केले.
त्यांच्या आवाहनाच्या वेळी एक महिला उत्स्फूर्तपणे व्यासपीठावर आली व सभेत तिने आवाहन केले कि, तिला एका विधवेने हळदी कुंकू लावावे. तिच्या या भावनेचा उपस्थित ग्रामस्थांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली. एका पुर्णांगिणीने तिला हळदी कुंकू केले. या प्रसंगी मुजावर म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे मी महिला, मुली, तृतीयपंथी यांच्यासाठी काम करते पण या ऐतिहासिक प्रसंगी मला गावाने बोलावलं व अशा भगिनी स्वतः पुढे येऊन असं सांगतात हा प्रसंग मी पहिल्यांदाच अनुभवते. ही परिवर्तनाची नांदी कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदा घडते आहे व मीही त्याची साक्षीदार आहे. मी आजवर केलेल्या छोट्याशा कामाची नवी पहाट आहे.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ, महिला व मुलींनी बाल विवाह व विधवा प्रथेच्या विरोधात सार्वमताने या विशेष महिला ग्राम सभेत ठराव केले. आभार प्रदर्शन हेही तितकेच संवेदनशील होते. पुर्णांगिणी सारिका भोसले यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच गावचे प्रयोगशील सरपंच विश्वनाथ कुंभार, ग्रा . प. सदस्य, महिला, मुली व मोठ्या संख्येने उपस्थित पुरुष वर्गाचे आभार मानले.