पुणे : समाजबंधच्या सावित्री फातिमा मंच या प्रकल्पात आरोग्य संवादकांची निवासी ‘मासिक पाळी संवादक कार्यशाळा’ २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पुण्यात उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रभरातून आलेल्या ४३० अर्जापैकी २० कार्यकर्त्यांची निवड यासाठी करण्यात आली होती.
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे ८ जिल्ह्यांमधून हे उत्साही कार्यकर्ते आहेत. या विषयावर काम करण्याची गरज, व्याप्ती, दृष्टिकोन, मुख्य विषय, अंधश्रद्धा, संवादकाची भूमिका, कौशल्ये, साधने असं एकेक विषय विविध खेळ घेत सविस्तर चर्चिला गेला.
रात्री उशिरापर्यंत पुस्तकाला स्टिकर चिटकवत गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व फेलो ने मिळून पथनाट्य कसे बसवावे हे स्वतः प्रात्यक्षिक करून शिकले. दोन दिवसात पुण्यातील समाजबंधच्या विक्रम, सायली, डॉ. शुद्धोधन, अश्विनी, नितेश या कार्यकर्त्यांनी दिलेल्या भेटी व अनुभव शेअरिंग मधून समाजबंधचे काम तसेच ‘कार्यकर्ता’ असणे किती महत्वाचे आहे हे आणखी नीट समजून घेता आले.
आत्मविश्वास येण्यासाठी व विषयाची उजळणी होण्यासाठी शेवटी सर्व फेलो नी एकेका उप घटकावर नमुना सत्र सादर केले. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, आशा सेविका, विद्यार्थी, सरकारी नोकरी असे विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या सोबतीने विषय समजून घेतले. मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या अंकाचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वैभव यांनी केले तर सचिनने कार्यशाळेत प्रशिक्षण दिले. किशोरभाऊ यांनी जेवण देऊन मोलाचे सहकार्य केले. पत्रकार प्रयागाताई, राजूदादा, अवधूत यांनी सदिच्छा भेट दिली.
हे संवादक पुढील सहा महिन्यात सर्वजण मिळून एकूण १२०० सत्र घेणार आहेत आणि त्या माध्यमातून २०,०००+ किशोरवयीन मुलींचे प्रबोधन करणार आहेत. यासाठीचा फेलो चा प्रवासखर्च, मानधन, मुलींना देण्याच्या पुस्तिका, स्टेशनरी, संवादक किट असे मिळून या उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या ९.५ लाख रुपयांचा खर्च येणा. असून लोकांमधील सामाजिक भानावर समाजबंधला विश्वास असल्याच्या भावना समाजबंधच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.