बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने दर वर्षी पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शनिवार दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी काकती येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी प्रास्ताविक करताना युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत पाठविणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सोमनाथ रूटकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून युवा समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. युवा समितीचे सहकारी कु. आशिष कोचेरी यांनी युवा समिती च्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी शिक्षिका एस. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तसेच के. एल. जगताप शिक्षिका यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवर्ग, पालकवर्ग, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सदानंद चौगुले, विनायक केसरकर, सुरज ऋटकुटे, कल्लाप्पा चौगुले आणि काम्मान्ना चौगुले हे उपस्थित होते.