पुणे : ‘हाताला काम आणि कामाचे दाम’ मिळत असल्याने ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंबाचा उदनिर्वाह चालवत आहेत. पिरंगूट जवळील अंबलवेठ गावात अराईस विश्व सोसायटीच्या ‘सबल’ प्रकल्पाअंतर्गत महिला सक्षमीकरणाचे काम सुरु आहे.
सबल प्रकल्पाअंतर्गत महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना नवनवीन प्रकारच्या कपडे शिलाईचे प्रशिक्षण दिले जाते. सोबतच रोजगार देखील उपलंब्ध करून दिला जातो. शालेय गणवेश, कंपनी कामगार युनिफॉर्म, अप्रोन, कापडी पिशवी, सॅनिटरी नेपकिन, बॅग, हातरुमाल, लहान मुलांची कपडे, टोपडी, लंगोट, उशांचे कव्हर यांसारखी अनेक कपडे या महिला शिवून देत आहेत. यामधून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळून कुटुंबाला हातभार लागतो.
याविषयी बोलताना शितल वाघमारे ताई म्हणाल्या, “संस्थेने आम्हाला कपडे शिलाईचे पहिलं प्रशिक्षण दिलं आणि लगेच काम देखील मिळवून दिलं. त्यामुळे प्रशिक्षण संपल्याबरोबर आम्हाला कामाचा मोबदला मिळू लागला. ग्रामीण भागात राहून रोजगार मिळाल्यानं माझ्या मिस्टरांवरचा आर्थिक बोजा थोडा कमी झाला.”
रेखा सुतार ताई म्हणाल्या, “आमच्या कुटुंबाकडे निश्चित असं उत्पन्नाचं साधन नव्हतं. त्यामुळं मिळेल ते काम करून पोट भरणे एवढच सुरु होतं. पण या कामातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याण बर वाटतयं. यातून कुटुंबाला कुठेतरी स्थिरपणा येईल. मुलांच्या शिक्षणासाठी माझ्याकडून हातभार लागेल.”
सबल प्रकल्पाच्या अंतर्गत सध्या १० महिलांना रोजगार मिळला आहे. आगामी काळात यांची संख्या वाढवायची असल्यास त्यांना कपडे शिवण्याची ऑर्डर देऊन त्यांच्या मालाला बाजारात योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. संस्थेमार्फत महिला सक्षमीकरणाचे अनेक प्रयोग राबविले जातात. यासाठी सहकार्याची गरज असते. तसे झाल्यास अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि खऱ्या अर्थाने सक्षम होतील असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त केला जातो.
महिला सक्षमीकरण बोलून किंवा केवळ महिलांना प्रशिक्षण देऊन होत नाही. यासाठी उत्पन्नाची साधने निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याची गरज असते. ज्यामधून त्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाहाचा प्रश्न मिटेल. अशा स्वरुपाच्या दिर्घकाळ किंवा कायमस्वरुपी उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रकल्पांची निर्मीती करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. सबल प्रकल्पाच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न सुरु आहे. आशुतोष शिरोळकर
अराईस सामाजिक संस्था, पुणे