सांगली : मराठा समाज, सांगली संस्थेकडून सन २०२२ साठी दिला जाणारा ‘ॲड. दत्ताजीराव माने अंधश्रध्दा निर्मूलन जिल्हास्तरीय कार्यकर्ता पुरस्कार’ सांगली येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल सुर्यकांत थोरात यांना जाहीर झाला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रशांत श्रीमंत पोतदार यांना “राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार’ जाहिर करीत आहोत असे संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी म. गांधी जयंती दिवशी दुपारी ४ वाजता माजी सनदी अधिकारी व थोर विचारवंत मा. डॉ. इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्या लोकनेते कै. राजारामबापू पाटील स्मृती सभागृहामध्ये होणार आहे.
राहुल थोरात हे नरेंद्र दाभोलकर यांचे प्रेरणेने अंनिसचे गेली २३ वर्षे पूर्णवेळ काम करत आहेत. ते सध्या अंनिसचे राज्य कार्यकारिणीचे राज्य सदस्य आहेत. त्यांनी अनेक बुवाबाबांचा भांडाफोड केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सोबत ते अंनिसचे काम करत असताना त्यांची सांगलीचे सुप्रसिद्ध विधिज्ञ दिवंगत दत्ताजीराव माने यांच्याशी संपर्क आला. राहुल थोरात यांनी दत्ताजीराव माने यांचे सोबत अंनिस, डॉ. दाभोलकर यांचे वर सनातनी मंडळींनी घातलेल्या कोर्ट केसेस लढवल्या आणि जिंकल्या. तसेच थोरात यांनी दत्ताजीराव माने यांचे ‘आयुष्यावर बोलू काही’ हे मुलाखतपर आत्मचरित्र ही लिहले आहे.
प्रशांत पोतदार हे अंनिसचे गेली २५ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहवासात त्यांनी कामाला सुरुवात केली, अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, मध्यवर्ती कार्यालयीन व्यवस्थापन, राज्यस्तरीय जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा इ. कामात ते सक्रिय असतात, त्यांनी अनेक बुवाबाबांचा भांडाफोड केला आहे. ते सध्या अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.
मराठा समाज, सांगली ही संस्था सांगली जिल्हयात समाज प्रबोधन व विविध सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असणारी संस्था आहे. ही संस्था अंधश्रध्दा व अनिष्ठ रूढी परंपरांचे निर्मूलन याबाबतच्या प्रबोधनाचे कार्यही करत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ॲड. दत्ताजीराव माने यांचे या क्षेत्रातील कार्य दिपस्तंभासारखे दिशादर्शक आहे. या दोघांच्या स्मृती जपणेसाठी म्हणून अंधश्रध्दा व अनिष्ठ रूढी निर्मूलनासाठी उत्तम कार्य करणा-या कार्यकर्त्यांचा मराठा समाज, सांगली संस्थेकडून पुरस्काराने गौरव केला जातो.
चालू वर्ष हे छत्रपती शाहू महाराजांचे जन्म शताब्दी वर्ष आणि मराठा समाज संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने संस्था अतिशय जिव्हाळयाने आणि उत्साहाने विविध उपक्रम साजरे करीत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाज संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.