पुणे | जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ या माहितीपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते. लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या प्रकारात हा महोत्सव झाला. पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पर्यटनातील व्यावसायिक संधी व माध्यमे या विषयावरील परिसंवादात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले आणि जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी यांनी विचार मांडले. प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराजराजे भोसले, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, उद्योजक रोहित राठी, महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार, संयोजन समिती सदस्य मनीषा उगले, अजित शांताराम, महेश गोरे, पवन घटकांबळे आदी उपस्थित होते.
विनोद बेले (कल्पतरु अॕग्रो टुरिझम) यांना उत्कृष्ट कृषी पर्यटन, गणेश जाधव व राजेंद्र आवटे (गंगोत्री होम्स अॕड हॉलीडेज) यांना उत्कृष्ट वॉटरफ्रंट रिसॉर्ट, मनोज हाडोळे (पराशर अॕग्रो टूरिझम) यांना उत्कृष्ट इनक्ल्यूजीव्ह टूरिझम, मिलिंद चव्हाण (रिवांता फार्म्स) यांना उत्कृष्ट बुटीक रिसॉर्ट इन कोकण, संकेत राका (द मिलर रेस्तराँ) यांना उत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, शिरीन वस्तानी (जेट एव्हिएशन) यांना उत्कृष्ट एम्पॉलयमेन्ट सपोर्ट इन टुरिझम, अभिलाष नागला (नंदग्राम गोधाम कृषी पर्यटन केंद्र) यांना उत्कृष्ट गौ पर्यटन या पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. उज्ज्वला बर्वे म्हणाल्या, “पर्यटन क्षेत्र खूप व्यापक आहे. या क्षेत्रात नोकरी, व्यवसायच्याहीची मोठ्या संधी आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. पर्यटन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. राज्यातील पर्यटन स्थळांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची ठरते. पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे. पर्यटन स्वछंदी जीवनाचा अनुभव घेणे आहे.”
डॉ. विश्राम ढोले म्हणाले, “पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यात माध्यमे महत्वाची भूमिका बजावू शकतात. छोट्या चित्रफिती, माहितीपट, लघुपट, ब्लॉग्स अशा माध्यमातून प्रसार करता येतो.” पर्यटन क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असून, पर्यटन क्षेत्र समजून घेत रोजगाराभिमुख शिक्षण घेतले, तर हे क्षेत्र अनेकांना रोजगार देऊ शकते, असे शिरीन वस्तानी यांनी नमूद केले.
शुभदा जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या. ‘गिरिकंद’वर विश्वास दाखवलेल्या हजारो पर्यटकांना हा पुरस्कार त्यांनी समर्पित केला. सूत्रसंचालन अभिषेक अवचार केले. गणेश चप्पलवार यांनी आभार मानले.
महोत्सवातील विजेते
माहितीपट : फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम (प्रथम क्रमांक), उमरिया की यात्रा (द्वितीय), गोमीरा मास्क डान्स (फेस्टीवल मेन्शन), विठ्ठलाचं झाड (फेस्टिवल मेन्शन), श्रीक्षेत्र टू शैजाता (ज्युरी मेन्शन), टू व्हील्स ४३५ दिवस (ज्युरी मेन्शन)
छायाचित्र : वारी-फुगडी योगेश पुराणिक प्रथम क्रमांक, निसर्गचित्र- थुल्लीमिल्ली प्रिन्स (द्वितीय), निसर्गरंग – ओंकार भोसले (फेस्टिवल मेन्शन)
लघुपट : ट्रॅव्हलर्स डिलाईट (फेस्टिवल मेन्शन). व्ही-लॉग : नेमाची वॉटरफॉल (फेस्टिवल मेन्शन)