सहकार महर्षी स्व.वि.गु.शिवदारे शिष्यवृत्तीचे वितरण
सोलापूर : समाजाच्या प्रगतीसाठी चांगल्या व्यक्ती व संस्था यांची गरज असते. त्यासाठी चांगल्या व्यक्तींनी सामाजिक कार्यासाठी पुढे आले पाहिजे. दररोजच्या जीवनातील काही वेळ आपण समाजासाठी दिला तर मोठे कार्य उभे राहू शकते. मात्र त्यासाठी सामाजिक कार्यात निस्वार्थपणे योगदान देणे गरजेचे आहे. गरीब गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानची संकल्पना निश्चितच स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले.माजी आमदार वि. गु. शिवदारे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, विश्वस्त सुभाष मुनाळे, प्रा. भीमाशंकर शेटे, प्राचार्य रविकांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी राजशेखर शिवदारे म्हणाले की, कै. शिवदारे अण्णांची खडतर परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी विशेष आपुलकी होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कै. वि. गु. शिवदारे शिष्यवृत्ती योजना सुरू केली. शिष्यवृत्तीची रक्कम मोठी नसली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर व्हावा ही त्यामागे भावना आहे.
जुळे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या समारंभात राजश्री राजन उजळंबे, सचिन श्रीशैल अचलेरे, प्रांजल परमेश्वर इब्रामपूरे, स्नेहा मेघराज माळशेट्टी, सुरज बसवेश्वर साखरे, अंबिका इरण्णा रामपुरे, दिक्षा सिद्धेश्वर पाटील, संध्या शिवशंकर नेंदाणे, शिल्पा केदार हदरे या वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या ०९ गरीब, गरजू व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची वि. गु. शिवदारे शिष्यवृत्ती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव नरेंद्र गंभीरे यांनी केले. सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. चनगोंडा हवीनाळे यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य श्रीकांत येळेगावकर, डॉ. बाहुबली दोशी, उल्हास पाटील, मल्लिनाथ विभुते, तुकाराम काळे, डॉ. सिद्धेश्वर वाले, अण्णासाहेब कोतली, चंद्रकांत रमणशेट्टी, पशुपती माशाळ, ऍड. डि. जी. चिवरी, एन. डी. जावळे, बाळासाहेब नष्टे, महेश अंदेली, चिदानंद मुस्तारे, सचिन विभुते, अमोल कोटगोंडे उपस्थित होते.











