रामवाडीत आयोजित कागद, काच, पत्रा वेचकांच्या मेळाव्याला २५० कचरावेचकांची उपस्थिती.
अहमदनगर : कागद, काच, पत्रा वेचक संघटनेच्या सदस्यांनी एकजुटीने एकमेकांवर विश्वास दाखवून कार्यरत रहावे तसेच या व्यवसायाबरोबरच पूरक पर्याय शोधावेत असे प्रतिपादन ऑल इंडिया कचरा वेचक संघटनेच्या प्रतिनिधी सुशीला साबळे यांनी रामवाडी येथे आयोजित कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत च्या मेळाव्यात बोलताना केले.
रामवाडी येथे आयोजित कष्टकरी पंचायतीच्या मेळाव्यात सुशीला साबळे बोलत होत्या. या मेळाव्याला रुक्मिणी पॉल, निकिता पाटील या उपस्थित होत्या. प्रारंभी मेळाव्याचे प्रास्ताविक कष्टकरी पंचायतीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उडानशिवे यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना भाऊसाहेब उडानशिवे यांनी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना, संघटना बांधत असताना तसेच कागद काच पत्र गोळा करताना संघटनेच्या सदस्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या.
सुशीला साबळे बोलताना म्हणाल्या ‘मुंबईसारख्या ठिकाणी काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो वास्तविक पाहता संघटनेच्या माध्यमातून काम करताना आपण महानगरपालिकेच्या एका रुपया मागे ३० पैसे वाचवतो. सध्या प्लास्टिक मुळे वाढणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न भीषण रूप धारण करत आहे. मात्र आपण प्लास्टिक कचरा गोळा करून तो रिसायकलिंग साठी पाठवतो. त्यामुळे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिक मुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.
शहरात साठणाऱ्या कागद, काच, प्लास्टिक पत्रा यावर कचरावेचकांचा अधिकार असल्याने तो त्यांना मिळाला पाहिजे. मात्र अलीकडच्या काळात मोठ्या मोठ्या कंत्राटदारांनी कचऱ्याची कंत्राटे भरल्याने त्यातून तंटे उद्भवतात. तर कंत्राटदार कागद काच प्लास्टिक वेचकांच्या हाती पडू देत नाहीत . त्यामुळे या वेचकांवर उपासमारीची वेळ येऊ पाहत आहे. त्यावर आता कागद, काच ,पत्रा वेचकांनी या व्यवसायाला अन्य पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. कचरा वेचकांनी या व्यवसायाला अन्य पर्याय शोधले पाहिजेत, मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेत या महिला कॅन्टीन चालवतात असे पर्याय शोधून काम केल्यास तसेच बचत गट निर्माण करून त्या माध्यमातूनही अन्य व्यवसाय चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकतात. त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. असे विचार कचरावेचक संघटनेच्या रुक्मिणी पॉल यांनी या मेळाव्यात मांडले.
निकिता पाटील यांनी शासन या कचरावेचकांच्या मुलांसाठी देत असलेल्या अनेक सवलतींच्या शिष्यवृत्तीची व अनेक योजनांची माहिती या मेळाव्यात दिली .त्याच बरोबर राज्यातील . त्याचबरोबर कचरावेचक आपल्या मुलींची लग्न लवकर करून दिली जातात, त्या ऐवजी त्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी चांगले शिक्षण द्यावे. या माध्यमातून एक पिढी कचरा वेचक असली तरी दुसरी पिढी सुशिक्षित बनू शकते असेही निकिता पाटील यांनी सांगितले .
नगर मधील महिलांनी काम करताना येणाऱ्या अडचणी यावेळी मांडल्या. संघटनेचे समन्वयक विकास उडानशिवे यांनी या मेळाव्यातील वक्त्यांचे आणि उपस्थित यांचे आभार मानले.