पंढरपूर : आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने होणारी लग्न फार थाटामाटात, वाजत गाजत पार पाडली जातात. याउलट आंतरजातीय लग्नाचा अपवाद सोडला तर फारसा गाजावाजा होत नाही आणि तसं कुणी करण्याच्या भानगडीत देखील पडत नाही. आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांचं कौतुक फक्त सोशल मीडियावर किंवा झालंच तर वर्तमानपत्रात छापून येण्यापुरतं मर्यादित राहतं. मात्र या पारंपरिक रितींना फाटा देत, आंतरजातीय लग्न करत विरोधकांच्या नाकावर टिच्चून आपल्याच शहरात जाऊन थाटामाटात सोहळा पार पाडण्याची कौतुकास्पद कामगिरी सुचरिता आणि निलेश या जोडप्यानं केली आहे.
दुखावलेल्या, कष्टी, उदास, उपाशी अशा अनेक गरजवंतांना आसरा देण्यासाठी वर्षानुवर्षे आपला पाय घट्ट रोवून उभं असलेले संपूर्ण महाराष्ट्राचे माय-बाप विठू-माऊलीचे पंढरपूर सुचरिता आणि निलेश यांचे गाव. जात-पात-धर्म-कर्म या गोष्टींना जिथं वेशीवर सोडल जातं. तल्लीन होऊन एकमेकांच्या गळा भेटीने परमेश्वराचा साक्षात्कार अनुभवला जातो. त्याच गावात माय-माऊली च्या साक्षीने आणि महापुरुषांच्या विचाराने आंतरजातीय विवाहाचा सामाजिक सोहळा दोघांनी करून दाखवला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक विवाह सोहळा आयोजित करणं करून दाखवणं तेवढं सोपं काम नाही.
सोहळ्याचं स्वरूप ही वेगळपण दाखवणार होतं. हॉलमध्ये लावलेले सर्व महापुरुषांचे फोटो आणि मध्ये असलेल्या भारतीय संविधानाची उद्देशिका यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आंतरजातीय विवाह संदर्भातील केलेलं मार्गदर्शन आणि विचार आलेल्या सगळ्या मंडळींना ऐकता आले.
सुचरिता आणि निलेश यांनी हा सोहळा आयोजित करण्यामागचा हेतू आपल्या मनोगतात मांडला आहे. हे मनोगत आणि आंतरजातीय विवाह संदर्भातील महापुरुषांचे विचार तसेच केंद्र आणि राज्यसरकारची अशा विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेली छोटी मार्गदर्शन पुस्तिका सर्व उपस्थितांना देण्यात आली. यामुळे आंतरजातीय विवाहासंदर्भात जबजागृती करण्याचा विचार सुचरिता आणि निलेशच्या कार्यक्रम नियोजनामागचा दिसून आला.
पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्न केल्यावर आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी केलेली मात हे सांगताना उपस्थित सर्व मान्यवर-मित्र परिवार भावुक झाले. सुचरिताने सांगितलं कि, एखाद्या स्त्री ने कोणताही निर्णय ठामपणे घेतला तर, तो निर्णय बरोबर असल्याचे ती सिद्ध करूनच दाखवते. तर, या पाच वर्षांच्या प्रवासात मित्रांनी केलेली सोबत आणि दिलेली साथ खूप मोलाची असल्याचं निलेश सांगायला विसरला नाही.
दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय लग्न केलं. लग्नानंतर दोघांनाही अनेक संकटाचा सामना करावा लागला. त्यातूनही त्यांनी एकमेकांना धीर देत सगळ्या संकटांवर मात केली. अशा स्वागत सोहळ्याचा एक भाग होता आलं, याचा आनंद असल्याचं मत आलेल्या प्रत्येकानी व्यक्त केलं. तसेच सुचरिता-निलेश ला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.