सातारा : शालेय शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. जिल्ह्यातील शेतकरी- कष्टकरी वर्गाला आयुष्य जगताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आर्थिक गणित जुळवताना काही लेकरे शिक्षणापासून वंचित राहतात, किंवा योग्य प्रकारे शिक्षण घेऊ शकत नाहीत या परिस्थितीत आपल्या माणसांचा आधार असावा तो आधार देण्याचे काम सारथी सामाजिक विकास संस्था गेले अनेक वर्षे करत आहे.
या वर्धापनदिनी व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सारथी सामाजिक विकास संस्थेकडून जावळी तालुक्यातल्या ७ शाळेतील १०० पेक्षा अधिक गरजु विद्यार्थ्यांना वह्या व तत्सम शालेय साहित्य वितरीत केले. यामध्ये खिलारमुरा, भोगवलीमुरा, रेंगडीमुरा, निपाणीमुरा, गाळदेव, सह्याद्रीनगर व ढेबेवस्ती येथील शाळांचा समावेश होता. या वेळी या वह्यांचे वाटप सारथीचे सदस्य व फेसबुक|सातारा समूहाचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिकण्याची जिद्द व आवड असल्यास केवळ आर्थिक अडचणींमुळे ते प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांची स्वप्ने पूर्ण होऊन देशसेवेसाठी येणारी भावीपिढी निर्माण व्हावी हे एकच स्वप्न उरात बाळगून सारथीतर्फे हा उपक्रम राबवला गेला.