वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे कार्य समाजासमोर आणणारा एक यशस्वी उपक्रम
ठाणे : आर्टिस्ट्री या संस्थेच्या वतीने दि. २५, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सीकेपी हॉल, खारकर आळी, कोर्ट नाक्यावळ, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते रात्री ९ ह्या दरम्यान देणे समाजाचे’ एक सद्भावना महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती वीणा गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आर्टिस्ट्री, पुणे प्रस्तुत
देणे समाजाचे’ हे एक अनोखे व्यासपीठ आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून देणे, त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजालाही त्यांचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून देणे, असा ह्या उपक्रमाच्या मागचा उद्देश आहे. २००५ ते २०२२ ह्या कालावधीत जवळपास २५० सामाजिक संस्था ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळवून दिली. सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी न करता हा भव्य उपक्रम गेली १८ वर्षे पुण्यामध्ये व्रतस्थपणे राबवला जातो.
देणगीदार आणि सामाजिक संस्था, यामध्ये एक विश्वासार्ह दुवा ठरलेल्या `देणे समाजाचे’ हा उपक्रम गेल्या ४ वर्षांपासून मुंबईमध्ये तर मागच्या वर्षीपासून ठाण्यात आयोजित केला जातोय. ह्या वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २४ सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले जाणार आहे. दि. २५, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सीकेपी हॉल, खारकर आळी, कोर्ट नाक्याजवळ, ठाणे (प) येथे सकाळी १० ते रात्री ९ ह्या दरम्यान आपल्यासारख्या समाजभान जपणाऱ्या सुहृदांनी उपक्रमाला भेट द्यावी आणि मानवतेच्या ह्या महोत्सवात सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
उपक्रमाचे उद्घाटन २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. डॉ आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. २५,२६ ह्या दोन्ही दिवशी, ह्या उपक्रमावर आणि वीणा गोखले यांच्या आयुष्यावर, राष्ट्रपती पदक विजेते जेष्ठ निर्माते, दिग्दर्शक प्रदीप दीक्षित यांनी बनवलेला लघुपट – Veena ,The chords of my life – दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.