पुणे : औंध जिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणीमध्ये संवाद समितीचे सदस्य व पत्रकार यांनी सहभाग घेतला. निमित्त तपासणीचे असले तरी यानिमित्ताने रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागातील डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांच्या संवाद समितीच्या सदस्यांसोबत गाठीभेटी व गप्पा झाल्या.
रुग्णालयातील विविध विभागाचे काम कसे कसे चालते ते सदस्यांनी समजावून घेतले. बालरोग विभाग, नेत्र रोग विभागात खूप चांगले उपचार मिळाल्याचे अनुभव यावेळी वस्तीतील नागरिकांनी शेअर केले. तसेच इतर काही विभागात आलेल्या अडचणी ही नागरिकांनी मोकळेपणे मांडल्या. दररोज किती पेशंट येतात, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची पदे किती रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा ताण येतो का, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कशी होते याबाबत ही यावेळी चर्चा झाली.
सरकारी हॉस्पिटल आपले आहेत, ती जपणे व चांगली चालवीत यासाठी प्रयत्न करणे ही नागरिकांची ही जबाबदारी आहे. चुकीचे घडत असेल त्यावर देखरेख करून ते थांबवणे, चांगले काम करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या भावनेतून औंध जिल्हा रुग्णालयात नागरिक व कर्मचाऱ्यांची संवाद समिती स्थापन झाली आहे. या संवाद प्रक्रियेतून सकारात्मक बदल घडून येत आहेत.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी सरकार कधीच पुरेसा निधी देत नाही, दिलेल्या निधीत मोठा भ्रष्टाचार करते याचा जाब वस्ती, सोसायटीमधील नागरिक जेव्हा लोकप्रतिनिधींना विचारू लागतील तेव्हाच बदल घडू शकणार आहेत.
तपासणी शिबिरांतर्गत विविध रक्त तपासण्या, ईसीजी, बीपी, नेत्र तपासणी, एक्स-रे आदी तपासण्या करण्यात आल्या. कस्तुरबा वसाहत, पाडाळे वस्ती, बोपोडी, म्हाळुंगे, औंध आदी भागातील संवाद समितीच्या १५ सदस्यांची यावेळी तपासणी करण्यात आली.
या उपक्रमात औंध रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, महाराष्ट्र राज्य कर्मचारी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत रिकामे, इब्राहिम खान, सकाळचे बातमीदार बाबा तारे, जागल्या वेब पोर्टलचे संपादक दीपक जाधव, तेलगू असोसिएशनचे राजू रेड्डी, सिफार संस्थेच्या पल्लवी जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते समीर फडतरे तसेच विविध विभागातील डॉक्टर, कर्मचारी व संवाद समितीच्या सदस्यांचा यामध्ये सहभाग राहिला.