नाशिक : जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना केसपेपर काढतांना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा प्रकार उघड झाला होता. आता तसा जातीचा उल्लेख वगळावा, असे आदेश आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शासकीय रुग्णालयात केसपेपर वर जातीचा उल्लेख करत असल्याचा प्रकार उघड झाल्याने महाराष्ट्रात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या विरोधात टिका केली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहित इतर संघटना व प्रकार माध्यमांनी त्याचा निषेध करून त्या विरोधात आवाज उठविला होता. जात पाहुन उपचार करणार का, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या लढ्याला आता यश आले आहे.
याबाबत आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे अहवाल मागितला होता. हा अहवाल अभ्यासल्यानंतर आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांनी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश काढले आहेत. लाभार्थ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी कोणतीच घटना आरोग्य घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
यापुढे केसपेपर वर जात जमात किंवा पोटजात यांची नोंद नकरता लाभार्थ्यांची माहिती अनुचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग या सामाजिक प्रवर्ग नुसार नोंदविण्यात यावी. केसपेपर नोंदणी शाखेतील कर्मचाऱ्यांचे व गरज पडल्यास लाभार्थ्यांचे समुपदेशन करावे, असे आदेशात म्हटले आहे.
“जिल्हा शासकीय रुग्णालयात आम्ही केसपेपर बघितला असता त्यावर जातीचा रकाना दिसल्याचे आढळून आले. त्यानंतर आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा केली व आरोग्य मंत्र्यांना निवेदन पाठविले. आता केसपेपर वरील जातीचा उल्लेख हटविणार असल्याने आनंद होत आहे. राज्याची पुरोगागित्वाची प्रतिमा अधिक उजळ झाली आहे ” – कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाहक, महाराष्ट्र अंनिस.