नाशिक : लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आयटी व्यावसायिक राहुल बनसोडे यांचा दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथे हृदयविकाराने अकाली मृत्यू झाल्यानंतर सबंध महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी समाजमाध्यमावर शोकभावना व्यक्त केल्या होत्या. राहुल बनसोडे यांनी विविध दैनिकांमध्ये आणि इतरत्र विपुल लिखाण केले होते. आता त्यांचे हेच लेखन पुस्तकरुपाने साहित्यविश्वात येणार आहे.
‘ब्लॅक इंक मीडिया’ संस्थेने राहुल बनसोडे यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या लेखनाचे संकलन केले असून ‘राहुल बनसोडे निवडक लेखसंग्रह’ या नावाने आता हे पुस्तक लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे. मानववंशशास्त्र, सामाजिक-सांस्कृतिक, पर्यावरण आणि विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर राहुल बनसोडे यांनी विविध दैनिकांच्या पुरवणीत आणि अनेक मासिकांमध्ये लिखाण केले होते. त्यातील निवडक लेखांवर आधारित हे पुस्तक आहे.
शनिवार, ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये ‘राहुल बनसोडे निवडक लेखसंग्रह’ पुस्तकाचे प्रकाशन होणार असून ज्येष्ठ लेखक आणि तत्वज्ञ श्याम मनोहर, कवयित्री-लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार, ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर, कवयित्री योजना यादव हे प्रमुख वक्ते उपस्थित असणार आहे. लोकेश शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र पोखरकर करणार असून कार्यक्रमाला राहुल बनसोडे यांचे कुटुंबीयही हजर राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन ब्लॅक इंक मीडिया, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि राहुल बनसोडे मित्र परिवार यांच्यामार्फत केले जाणार आहे.
‘राहुल बनसोडे निवडक लेखसंग्रह’ या पुस्तकातून मिळणारे सर्व उत्पन्न हे राहुल बनसोडेंच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याने अधिकाधिक लोकांनी हे पुस्तक विकत घेण्याचे आवाहन ब्लॅक इंक मीडियाचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांनी केले आहे. पुस्तकाची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी 7020045653 (आशय येडगे) यांच्याशी संपर्क साधावा.