पुणे : शाश्वत विकास उद्दिष्टे चांगले आरोग्य आणि कल्याण, दर्जेदार शिक्षण, लिंग समानता (3,4,5 शा. वि. उ.) याव्दारे सध्या पुणे येथील शाळा आणि वस्त्यांमध्ये ०३ ते २५ वर्षे वयोगटातील एकूण ३०० पेक्षा जास्त बाल, किशोर आणि युवांसाठी अवली प्रकल्प सुरू आहे. अवली सर्वांगिण विकास कार्यक्रमाची एक भूमिका म्हणजे उत्पादक आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीचे पालनपोषण करणे. दुसरे म्हणजे योग्य प्रकारची मूल्ये रुजवणे.
अराईस विश्व सोसायटीचे अध्यक्ष आशुतोष शिरोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवली क्रियाकलाप सत्राद्वारे विद्यार्थ्यांची स्व ओळख, नवा विचार, आकलन, दृष्टिकोन, क्षमता, कल्पकता, प्रयोग, हक्क, जबाबदारी, लिंगसभाव, आरोग्य स्वच्छता, पर्यावरण बदल, वैज्ञानिक दृष्टिकोन, अर्थ शिक्षण, जमा खर्च, अंदाजपत्रक, गुंतवणूक, व्यवहार, नोकरी कि व्यवसाय आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी इत्यादी बाबत विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. चर्चासत्र, माहिती संकलन आणि कृती याद्वारे प्रत्यक्ष कृतीमधून सर्व होत असल्याने विद्यार्थांना स्वयं चालना, आत्मविश्वास, एक निर्भय भविष्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळते.
अवली प्रकल्प पुस्तिका रचना ही म्हणजे आजपर्यंतच्या प्रवासात बाल, किशोर, युवा यांसोबत संवाद साधण्यासाठी खेळ, शिक्षण, गंमत, करत त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी खाद्य पुरवण्यासाठी, विचारांना चालना देण्यासाठी, मुक्त अभिव्यक्ती प्रोत्साहन, संकलित केलेला उपक्रम व कृती कार्यक्रमांचा एक अमूल्य ठेवा आहे. पुस्तिका ६ विभागात (१. व्यक्तिगत, २. सामाजिक, ३. आरोग्य आणि स्वच्छता, ४. पर्यावरण, ५. विज्ञान आणि तंत्रज्ञान, ६. आर्थिक ) विभागली असून प्रत्येक विभाजन हे स्व विकास होण्यासाठी विभागले आहेत. ७ वा विभाग {७. सामाजिक मेळावा ( समारोप ) } हा अराईस विश्व सोसायटी संस्था, अवली उपक्रम आणि सर्व सहभागी संस्था, शिक्षक, प्रशिक्षक, आणि ज्यांच्यासाठी उपक्रम ते विद्यार्थी यांच्या कार्याची पावती आहे.
मागील दहा वर्षांपासून अराईस विश्व सोसायटी सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक, विवीध सामाजिक संस्था, विद्यापीठ सदस्य, कर्मचारी, कार्यकर्ते, विवीध संदर्भ ग्रंथ, संदर्भ पुस्तिका यांच्या प्रत्यक्ष अनुभवी मार्गदर्शनाखाली विचार विनिमय करून अमूल्य ठेवा संकलित करुन जुलै २०२३ पासुन याची सुरुवात केली आहे. आपणही अवली उपक्रमात सहभागी होऊ शकता असे संस्थेचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.