पुणे : “जागतिक स्मृती दिन” हा रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहणे, रस्ते अपघातातील पिडीतांच्या कुटुंबियांना आधार देणे व अपघात ग्रस्त लोकांना सल्ला मसलत करण्यासाठी व अपघात रोखून जीवन संरक्षणास्तव सामाजिक कृतीस प्रेरित करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी पाळला जातो. जागतिक बँकेच्या अहवालाप्रमाणे अपघातामुळे मृत्यू व जखमी होण्याच्या प्रमाणात भारत शीर्षस्थानी आहे. भारतात प्रत्येक तासाला ५३ रस्ते अपघात घडतात ज्यामध्ये प्रत्येक ४मिनिटामध्येएका व्यक्तीचा मृत्यू होतो. (https://bit.ly/30JcfdW )
जनजागृतीच्या माध्यमातून रस्ते अपघात रोखणे या उद्देश्याने सेफ किड्स फाउंडेशन संस्थेद्वारे “जागतिक स्मृती दिन २०२१” निमित्ताने चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क, अर्बन ९५, औंध, पुणे येथे साहित्य व चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती केली. बालक व प्रौढ यांच्यामध्ये कृतीगीत व माहितीपत्रक याद्वारे रस्ता सुरक्षा नियम पाळण्याबाबत तसेच सुरक्षित रस्ता वापरकर्ता बनून अपघात टाळण्याबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या की, “सेफ किड्स फाउंडेशन संस्था रस्ता सुरक्षा जागृती कार्यासाठी कटिबध्द आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी संस्थेद्वारे वर्षभर अथक प्रयत्न केले जात आहेत ज्याद्वारे साल २००७ पासून आजतागायत मुंबई, पुणे, दिल्ली व अहमदाबाद शहरातील ४ दशलक्ष बालकांना व पालकांना प्रशिक्षित केले आहे. “जागतिक स्मृती दिन २०२१” प्रसंगी नागरिकांना सुरक्षित रस्ता वापरकर्ता होण्याचे, अपघात टाळण्याचे व मृत्यू रोखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.”