पुणे : कामगार, कष्टकरी नेते आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे सर यांची एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सचिवपदी निवड झाली आहे.
समाजवादी नेते एस एम जोशी यांच्या स्मरणार्थ १९८९ साली सुरु झालेले एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन हे राज्यातील डाव्या, समाजवादी, पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधनाचे आणि आधाराचे स्थान आहे. २००७ पासून फाउंडेशनचे विश्वस्त सचिव म्हणून कामात प्रा. सुभाष वारे सर आहेत. फाउंडेशनच्या वास्तूत तरुणाईचा वावर वाढावा यासाठी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करत फाउंडेशन हे एस एम अण्णांच्या विचारांचे जीवंत स्मारक कसे बनेल यासाठी वारे सरांनी केलेले प्रयत्न सर्वांनी पाहिले आहेत. पण नुकतेच वारे सर सचिव पदावरून पदमुक्त झाले आहेत. इतक्या महत्वाच्या पदावरून स्वतःहून मुक्त होणे हे आश्चर्यकारक आहेच, पण खुर्ची मोहमुक्त असल्याचे हे महत्वाचे उदाहरण आहे. या पुढे वारे सर सचिव नसले तरी विश्वस्त म्हणून फाउंडेशनच्या कामात असणार आहेत.
आता या सचिव पदाची जबाबदारी सुभाष लोमटे सर यांच्याकडे आली आहे. लोमटे सरांचे औरंगाबाद भागातील कष्टकरी, कामगार विषयातील काम आदर्शवत आहे. त्यांच्या निवडीने फाउंडेशनच्या कामालाही निश्चितच उभारी मिळणार आहे. लोमटे सर हे मराठवाडा लेबर युनियनच्या मार्फत असंघटित कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सतत कार्यरत राहिलेले आहेत. त्यांच्या सामाजिक कामाची सुरुवात १९७३ मध्ये युक्रांदच्या वतीने सुरु झालेल्या ” दलित शिष्यवृत्ती वाढ ” आंदोलनापासून झाली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला आहे. शेतमजुरांसाठी किमान वेतन व सर्वंकष कायदा, भूमिहीनांना हक्काची जमिन मिळावी, रोजगार हमी कायदा राष्ट्रीय पातळीवर राबविला जावा, असंघटित कष्टकऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर एकजुट व्हावी यासाठीच्या प्रयत्नात सुभाष लोमटे यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.