बार्शी : तिचं वय अवघं ८ वर्षे. जन्मत: ती दोन्ही डोळ्यांनी अंध. आपणही समवयस्क मुलींसोबत शिकावं, असं तिला नेहमी वाटायचं. मात्र निसर्गानं जे दिलीय ते स्विकारत तिचा जगण्याचा अन् शिकण्याचा संघर्ष सुरु झाला. आपल्या पोटच्या जीवासाठी शक्य ते सर्व करायचं; असं तिच्या आई-वडिलांनी ठरवलं. वय वाढत होतं तसं तिची समजही वाढत होती. आकलन क्षमतेच्या जोरावर अगदी काही वेळातच अभ्यासातलं ‘ती’ तोंडपाठ करायची. सर्वांना तीचं कौतुकही वाटायचं. ईश्वरी धनाजी बरडे; असं तिचं नाव.!
कोरफळे गावातील ईश्वरी आता तिच्या दातृत्वामुळे चर्चेचा विषय बनलीय. आपल्या वाढदिवसानिमित्त केक व भेटवस्तुला फाटा देत आपल्या वडिलांना तिनं स्नेहग्रामला मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार कोरफळ्यातील विनया व महेश निंबाळकर दांपत्य चालवत असलेल्या स्नेहग्रामच्या मुलांसाठी बचत केलेल्या पैशांची हंडी भेट देण्याविषयी ठरवले. सर्वप्रथम ईश्वरीच्या आई-वडिलांना तिच्या निर्णयाचं कौतुक वाटलं. मग बरडे दांपत्यानं ठरवलं की ईश्वरीची पैशांची हंडी व स्वत:जवळची अजून काही रक्कम मुलीच्या वाढदिनी स्नेहग्रामला द्यायची. त्यानुसार स्नेहग्रामच्या कार्यासाठी तीस हजारांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.
यावेळी केक ऐवजी सफरचंद कापून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. स्नेहग्रामच्या मुलांनी उसाच्या रसाचा आस्वाद घेतला, तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सविता शिंदे, विनया निंबाळकर, महेश निंबाळकर, भारत बरडे, शंकर पाटील, धनाजी बरडे, बाबा ठाकरे, सागर जगताप, अनिल गिराम, बाळासाहेब शिंदे, प्रवीण घेमाड, सोनाली बरडे, अर्चना बरडे, प्रियंका बरडे, रोहीणी घेमाड, उज्ज्वला घेमाड, कोमल बरडे, दैवशाला शिकेतोडे, प्राजक्ता कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
ईश्वरीनं केलेली कृती मानवतावादी अन् प्रेरणादायी असून बरडे कुटुंबियांनी स्नेहग्रामला दिलेली आर्थिक मदत प्रकल्पाच्या बांधकामासाठी वापरणार असल्याची माहिती महेश निंबाळकर यांनी दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी संतोष बरडे, रणजित बरडे, सुधीर बरडे,नेताजी बरडे, शंकर बरडे आदिंनी परिश्रम घेतले.