सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दिवंगत प्रा. प. रा.आर्डे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘प्रा. प. रा.आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार २०२४’ हा सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या क्रियाशील कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, रूपाली आर्डे कौरवार, राहुल थोरात यांनी दिली.
या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५००० रोख आणि स्मृतीचिन्ह असे आहे. आर्डे सरांच्या स्मरणात त्यांच्या कुटुंबीयांकडून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
यावर्षी बुधगाव येथील डॉ. सविता अक्कोळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.अक्कोळे या वैद्यकीय व्यावसायिक आहेत. आर्डे सरांच्या सोबत त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी गेली अनेक वर्षे जोडल्या गेल्या आहेत. सध्या त्या सांगली अंनिसच्या सचिव म्हणून काम करतात. त्यांनी महिलांचे जटा निर्मूलन, बुवा बाबांचा भांडाफोड अशा मोहिमेमध्ये हिरीहिरीने भाग घेतला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर घेतलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या संयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्या पक्षीमित्र असून पक्ष्यांची छायाचित्रे काढण्याचा त्यांना छंद आहे.
या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध साहित्यिका नीलम माणगावे यांच्या हस्ते आर्डे सरांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता यशवंतनगर (सांगली) येथे आर्डे सरांच्या घरी होईल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे या आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली शाखेने केले आहे.